झारा - लिना मेस्त्री ( Zharaa by Leena Mestry)
एका वळणावर ट्रकचा मोठ्याने हॉर्न वाजतो . हळूहळू चढाव चढत वर येणाऱ्या ट्रकचा आवाज जवळ येऊ लागतो.तसंच डोंगरावरून दुरून कोणीतरी धावत येताना दिसत. ट्रक बरोबर डोंगराच्या पायथ्याशी येतो .दगडांनी भरलेल्या ट्रकवर लालबुंद झालेले दोन तीन जण बसलेत, एवढ्यात डोंगरावरून धावत येणारी ती मोठ्याने हात हलवून इशारा करते. आणि ट्रक दूर निघून जातो. नेहमीप्रमाणे झारा तो दिसल्याच्या निरागस आनंदात घरी येते.
झारा एका खाणीवरच्या झोपडीत निपचित पडली आहे ,आणि तिचं पोर ,आठ वर्षाचा तो, बाजूला बसून पाठीवर छान आपल्या घराचे सुंदर चित्र काढतोय.आणि झाराला खूप वेळ उठवतोय, पण ती उठत नाही. सकाळी तिला, नवऱ्याने पिऊन खूप मारलेले असत.ती आपल्या पोराला काहीच सांगत नाही. रोज मार खाऊन निष्ठुर बनत चाललेले तिचं मन, एक दिवस याला आपलं निरागस प्रेम समजेल या एकाच आशेवर वेड्यासारखं त्याच्या प्रेमाची वाट पाहत असतं. मार खाताना फक्त तिला एवढच वाटत असतं, का कधीतरी आपण त्या दारूच्या दुकानाला आग लावणार. त्या दोघांच भांडण आणि नवऱ्याचं मारणं हे आता शेजाऱ्यांच्या सवयीच झालय. ते कोणीच बघायला सुद्धा येत नाहीत,.
आज बऱ्याच दिवसांनी झारा खूप आनंदी असते. कारण आता आपल्या बाळाची चाहूल लागल्याची बातमी समजल्यावर तरी यल्लाप्पा दारू सोडेल, सुरुवातीला झिलूच्या वेळी त्याने काही दिवस सोडली होती.
एवढ्यात बाहेर मोठ्याने शिव्या दिल्याचा आवाज येतो .झोपडीच्या समोर बरीच लोक जमलेली असतात ,झारा झोपडीच्या दरवाजातून झिलू ला आत व्हायला सांगते आणि दरवाजा बंद करून बाहेर येते .जमलेल्या मधून एक जण बोलतो, "ए बये ,तुझ्या नवऱ्यास सांग, नाहीतर मरल लेकाचा! " काय केलं त्याने.! चोर साला !माझ्या घरचा टायर विकायला निघाला होता. हे रोजच झालय त्याचं. पिऊन आधीच तरर असतो आणि पैशासाठी दिसल ते उचलतो....अजून चार शिव्या घालतो......दोघेजण मारत ...यल्लाप्पाला झोपडीच्या दारात आणून टाकतात.
वेड्या झाराचं नवऱ्यावरचं प्रेम आडवं येतं आणि त्याला ती घरात घेते. गरम पाण्याने अंग शेकून काढते. हा नशेतच बरळत असतो ,झारा तुझी शपथ मी नाही केली चोरी ! ही त्याला चार घास भरवते ..त्यांच पोरगं सगळं निमूट पणे बघत असतं.
आज दुपारी झारा त्याला सांगायचं ठरवते ,तो येतो तो सरळ शिवा घालायला सुरुवात करतो. आज प्यायलेला नसतो पण बाटली घेऊन घरातच बसतो.झारा सांगते पोरग बघतय, त्याच्या पुढ्यात नको. झिलू पडद्या अाडून सगळं बघत असतो. हा झाराकडे पैसे मागतो तर ती सरळ नाही म्हणते हा पुन्हा तिला मारायला उठतो, झिलू धावत पुढे होतो. आपल्या आयला आता तू मारायचं नाही. मी मारेल तुला. त्याचा पारा चढतो आणि तो पोराला जोराने ढकलतो. आज पर्यंत तिने खूप मार खाल्ला पण झिलू ला पडलेला पाहून झारा मात्र संतापते आणि त्याच्यासमोर पडलेली दारूची अख्खी बाटली स्वतःच्या घशात रिकामी करते तुला वाटलं काय तू एकटा पिऊन मारू शकतोस आता बघ मार खाताना कसं वाटतं ते. जवळच पडलेला दांडा घेते आणि जमेल तसं मारायला सुरुवात करते. याचा संताप अजूनच वाढतो आणि रागाच्या भरात त्याच दांड्याने तो एकच फटका मारतो आणि झारा जमिनीवर आदळते. सगळी झोपडी शांत होते. हा घरातून निघून जातो.
दूरवरून मोठ्याने दगड ओतल्याचा आवाज येतो ..जोराने डंपरचा हॉर्न वाजतो. ...सगळीकडे शांतता....फक्त रात किड्यांचा प्रचंड आवाज कानावर येत असतो. जवळच्या झोपड्यांमध्ये हळूहळू दिवे लागतात...उशिरा हा घरी येतो.झीलू तिच्या अंगाला गरम पाण्याने शेकत असतो.. झिलूने तिच्यासाठी डोंगरातून चिंचा आणलेल्या असतात.. यल्लप्पा चिंचा हातात घेतो आणि झाराला सांगतो उठ मला भूक लागली तुझी आणि आपल्या पोराची शपथ मी परत नाही करणार....बरंच बरळतो...प्यायलेलाअसतो...पुन्हा रागावतो उठतीस का आता...!! पुढे येतो, तर झरा पूर्णपणे शांत झालीय. झिलू त्याला सांगतो, उठवू नको तिला, दूर हो, आत्ताच झोपलीय.
हा जोर जोरात रडायला लागतो. झीलू मेली ती ..!! झिलू, तूच मारलास माझ्या आयला ..!.आता नाही हात लावायचा..! .यल्लाप्पाच्या डोळ्यासमोरून पटापट झराच्या आठवणी सरकतात.... एका क्षणात प्यायलेली दारू उतरते .त्याला आत्ता जाणवतं दारूपाई झालं सगळं...तो दारूची बाटली जोराने जमिनीवर आपटतो आणि झोपडीच्या बाहेर निघून जातो. रात किड्यांचा आवाज शिगेला पोहोचतो आणि डोंगरावर हळूहळू सूर्योदय होतो.
पुन्हा लोकांचा गजबजाट ..... याला कोणीतरी झोपडीच्या आवारात आणून फेकतो आणि पुन्हा चार जण याला बेदम मारतात हा कसातरी सावरतो स्वतःला आणि वर झोपडीकडे येतो. झोपडी केव्हाची शांत झालेली असते....आता आगीचं नावही नसतं .... हा दारूच्या गुत्याला आग लावतो आणि ते लोक याच्या झोपडीला. सगळं संपतं. ...
संध्याकाळची वेळ पुन्हा ट्रकचा चढाव चढल्याचा आवाज येतो...मोठ्याने हॉर्न वाजतो....हा जीव तुटेपर्यंत धावतो डोंगरावर येऊन पोहोचतो....ट्रकमध्ये दगडावर बसलेली दोन-चार पोरं ...लालबुंद धुरळा उडवत,...ट्रक दूर दिसेनासा होतो....



Comments
Post a Comment