वळ तिरस्काराचे - वैष्णवी कुलकर्णी (Vala tiraskarache by Vaishnavi Kulkarni)

" का आला आहात तुम्ही इथे ? आता अजून काय उध्वस्त करायचं शिल्लक आहे तुमचं ? का आम्हाला सुखाने जगू देत नाही आहात तुम्ही ? काय हवंय तुम्हाला आता ? "उंबरठ्याबाहेर केविलवाण्या नजरेने उभ्या असलेल्या त्याच्याशी सानिका तावातावाने बोलत होती.



 तिचे कान संतापाने लाल झाले होते आणि नजरेत केवळ आणि केवळ तिरस्कार भरला होता तिच्या. तिची आई , राजश्री तिला समजावत होती." सानिका , अगं , असं काय बोलतेस तू आणि आजूबाजूच्या लोकांना काय म्हणून हा तमाशा दाखवायचा ? आपण आत जाऊन बोलूया ये , तू.....सानिका : थांब आई , अजिबात आत घ्यायचं नाही या माणसाला आणि आजूबाजूच्या लोकांनाही कळू देत ना की हा माणूस तुझ्याशी , आपल्या साताजन्माच्या जोडीदाराशी आणि त्याच्याच रक्तामांसाची असलेल्या त्याच्या लेकिशी , म्हणजेच माझ्याशी कसा वागला आहे ते...राजश्री : अगं ऐक ग राणी थोडं माझं , तू शांत हो पाहू आधी , चल , ये आत....विनय....चला आत..

सानिकाने पुन्हा एकवार त्याच्याकडे एक तिरस्काराने भरलेला जळजळीत नेत्रकटाक्ष टाकला आणि ती थाडथाड पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. राजश्रीने विनयला आत घेतले आणि दाराला कडी घातली. सोफ्यावर अवघडून बसलेला विनय आकर्षकपणे सजवलेले आणि टापटीप ठेवलेले राजश्रीचे घर पाहू लागला.राजश्री : घ्या , पाणी प्या...तिच्या हातून पाण्याने भरलेला तांब्या घेत विनय २ ग्लास थंड पाणी गटागटा प्यायला. पाणी पिऊन त्याला जरा तरतरी आली.राजश्री : चहा घेणार ?त्याने मानेनेच होकार दिला. राजश्री चहा करून आणते तोपर्यंत तो सोफ्यावर तसाच बसून होता.विनय : छान झालाय चहा , आजही......राजश्री : आजही काय ?विनय : आजही तीच चव आहे तुझ्या हातच्या चहाला.... राजश्री कसंनुसं हसली.

राजश्री : विनय , सानिकाच्या तुमच्यासोबतच्या वर्तनासाठी तिच्यावतीने मी सॉरी म्हणते.विनय : अगं , तू का सॉरी म्हणतेस ? तुझी काय चूक त्यात ? सानिका जे बोलली ते खरंच तर आहे...मी , मी उध्वस्त केलंय तुम्हा दोघींचं आयुष्य , माझ्या फुटकळ स्वार्थापायी आणि म्हणूनच एक बाप , एक नालायक बाप म्हणून सानिका माझा तिरस्कार करते. तुम्हाला दुखावून जी पापं केली आहेत , त्याचीच तर शिक्षा भोगून आलो आहे मी. पण आता मला नाही वाटत की सानिका मला या घरात राहू देईल म्हणून...मी...मी जातो इथून....बघू दुसरीकडे कुठे सोय होते का ते....राजश्री : विनय , असं नका ना हो बोलू...आधीच तुमच्याशिवाय ही १० वर्ष कशी काढलीत , जगाला कसं तोंड दिलं हे माझं मलाच ठाऊक...आणि आता पुन्हा तुम्ही जायची भाषा करता आहात ? आतल्या खोलीतून हे ऐकत असलेली सानिका आईचं हे बोलणं ऐकून बाहेर आली. सानिका : आई , आई , अगं काय बोलतेस तू हे ? ज्या माणसामुळे तुला आणि मला इतकी वर्ष लोकांचे टोमणे सहन करावे लागले , तुला ऑफिसमध्ये आणि मला माझ्या शाळेत , कॉलेजमध्ये सगळ्यांनी प्रश्नांचा भडिमार करून भंडावून सोडलं त्या...त्या माणसाला तू इथेच रहा म्हणून सांगतेस.... ..राजश्री : सानु....तू थांब जरा...विनय : सानिका , बेटा....सानिका : मला बेटा म्हणू नका , मला लाज वाटते तुमची , माझ्या कडून तुम्हाला तिरस्काराशिवाय काहीही मिळणार नाही. तुम्ही तर १० वर्षांपूर्वी तुमच्या ऑफिसमधल्या त्या... त्या नटरंगी प्रियांकासाठी हे घर सोडून आम्हाला सोडून निघून गेलात , पण त्यानंतर आईने मला कसं वाढवलं , आम्ही कशा जगलो याचा काही विचार केलात ? आईने खडतर परिस्थितीत नोकरी केली , जगाच्या भेदक नजरांना , सगळ्यांच्या तिरस्कृत माऱ्यांना झेलून देखील ती खंबीरपणे केवळ माझ्यासाठी उभी होती. आज हे , हे जे सगळं घराचं वैभव तुम्हाला दिसतंय ना , ते केवळ माझ्या आईच्या मेहनतीमुळे आहे. तुमचं काहीही कर्तृत्व नाहीये त्यात...एका दमात एवढं सगळं बोलल्यामुळे सानिकाला दम लागला होता. त्यामुळे ती तिथेच बसली.राजश्री : झाली तुझी आगपाखड करून ? आता जरा शांत हो...एक लक्षात घे सानिका ,न्यायालय सुद्धा आरोपीला आपली बाजू मांडण्याची एक संधी देत असतं मग त्याचा गुन्हा सिद्ध झालेला का असेना , तो देखील जगाच्या तिरस्काराचा धनी झालेला असतो पण तरीही एक व्यक्ती म्हणून त्याला त्याची बाजू मांडायला दिली जाते.सानिका : अगं पण आई तू हे सोयीस्कर कशी विसरू शकते की....राजश्री : मी काहीही विसरले नाहीये सानु...तुला नाण्याची केवळ एकच बाजू माहीत आहे. आज दुसरी बाजू मी सांगते तुला.              मला हे कबूल आहे की त्या....त्या प्रियांकासाठी विनयनी तू घरात असताना तावातावाने माझ्यासोबत भांडण केलं , माझ्यावर हात उगारला आणि ते घर सोडून निघून गेले. परंतु हे त्या प्रियांकाच्या घरी पोचले आणि फ्रेश व्हायला गेले असताना तिने ह्यांची बॅग तपासली. तिला अपेक्षा होती की विनय तिच्याकडे जाताना माझे दागिने , भरपूर पैसे आणि काही ब्लँक चेक्स घेऊन गेले असतील. परंतु तिला बॅगेत त्यांचे कपडे आणि.....सानिका : आणि काय.....?राजश्री : माझ्याशी कसाही वागला तरी सानिका , विनय तुझा बाबा आहे आणि म्हणूनच तो जाताना तुझा फोटो जो आमच्या खोलीत लावलेला होता , तो घेऊन गेला. या गोष्टी पाहून प्रियांकाच्या तळपायातची आग मस्तकात गेली आणि तिने तिच्या प्रियकराला फोनवरून या गोष्टींची कल्पना दिली. ती म्हणत होती....संदीप , हा माणूस तर दरिद्री निघाला. दागिने , पैसे , चेक्स काहीच आणलं नाही...आणले तर स्वतःचे कपडे आणि त्या दळभद्री मुलीचा फोटो.... माल मिळाला असता तर आज रात्रीच आपण दोघे सिंगापूरला कायमचे पळून गेलो असतो...काही कामाचा नाही हा.....आणि मी बघते काय करायचं ते असं म्हणून तिने फोन ठेवला.विनय : ती मागे वळली. मी तिचं सगळं बोलणं ऐकलं आहे हे तिला कळताच तिचा चेहरा पांढराफटक पडला.  तिचं.... तिचं मला राजश्रीपेक्षाही अधिक आवडायला लागलेलं सौंदर्य आता राक्षसी आणि मायावी वाटू लागलं होतं. आजपर्यंत तिच्याबद्दलच्या खोट्या प्रेमाने भरलेलं माझं मन तिच्याबद्दलच्या तिरस्काराने भरून गेलं. असल्या हलकट , नीच बाईच्या नादाला लागून मी माझ्या सोन्यासारख्या संसाराची राखरांगोळी केली होती. मी तिच्या दोन मुस्कटात ठेवून दिल्या. आमची खूप झटापट आणि बाचाबाची झाली त्यावेळी. हे सगळं सुरू असताना कसा कुठून जाणे तिचा प्रियकर, तो संदीप तिथे येऊन पोचला आणि त्याने माझ्यावर झडप घातली. त्याला देखील मग मी यथेच्छ चोपला. तिथून बॅग घेऊन बाहेर पडत असताना त्या संदीपने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. मात्र या सगळ्या झटापटीत त्याच्या हातून प्रियंका.....प्रियंकाचा खून झाला होता....राजश्री : आणि त्याने शिताफीने सगळे आरोप विनयवर ढकलले आणि नव्याने तयार केलेल्या पुराव्यांच्या साथीने ते सिद्ध देखील केले. परिणामी , ह्यांना १० वर्षाची सक्तमजुरी भोगावी लागली.सानिका : पण आई...हे...राजश्री : मला कसं ठाऊक हेच ना....दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पेपरमध्ये ही बातमी पाहिली तेव्हा तुझ्या सारखंच माझंही मन विनयबद्दलच्या तिरस्काराने भरून गेलं. परंतु त्याच वेळी हा ही विचार मनात आला की ज्या माणसावर मी अतोनात प्रेम केलं तो माणूस मला सोडण्याची हिंमत करेल परंतु कोणाचा जीव तो नक्कीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी काही दिवसानंतर जेव्हा विनयला तुरुंगात भेटायला गेले तेव्हा ही सगळी कर्मकहाणी त्यांनीच मला सांगितली. मी अधूनमधून जायचे विनयला भेटायला , तुझी खूप आठवण काढायचे ते,पण तुझ्या नजरेत आता त्यांना पूर्वीचं प्रेम कधीही दिसणार नाही म्हणून खूप अस्वस्थ देखील असायचे.  विनय : मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आज सुटून आलो आहे मी...पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाकडे , माझ्या दोषांना विशाल हृदयाने क्षमा केलेल्या माझ्या प्रिय पत्नीकडे , माझ्या  लेकीकडे...तुम्हा दोघींना सोडून जाण्याचा माझा गुन्हा क्षम्य नक्कीच नाही. त्याबदल्यात सानू , तुझा तिरस्काराच्या आसुडाचे वळ देखील मी सोसायला तयार आहे पण.....पण आता मी तुमच्या दोघींपासून लांब राहिलो ना तर....तर मला मरण येईल गं.....क्षमा कर ग पोरी तुझ्या ह्या अभागी बापाला...असं म्हणून तो फरशीवर बसून ओक्साबोक्शी रडू लागला. सानिकाला आपण सत्य जाणून न घेता हे काय करून बसलो ह्याचा पश्चात्ताप होत होता. आजपर्यंत तिने एक बाप म्हणून विनयचा केवळ तिरस्कार केला होता पण आता तिला स्वतःच्या विचारांचा तिरस्कार वाटू लागला होता.सानिका : बाबा....    ही हाक ऐकण्यासाठीच तो गेल्या १० वर्षांपासून आसुसला होता. आपल्या लेकीला पुन्हा एकदा पाहता यावे , तिच्या तोंडून बाबा ऐकायला मिळावे म्हणून कानात प्राण आणून त्याने तुरुंगातला काळ घालवला होता.विनय : सानू , सानू....सानिका : उठा बाबा.....मला माफ करा बाबा , नाण्याची दुसरी बाजू ऐकून न घेताच मी देखील  तुम्हालाच दोषी ठरवलं. सॉरी...आता तुम्ही कायम आमच्या सोबतच राहणार आहात , इथून कुठेही जाणार नाही आहात , कळलं ?विनय : हो गं चिमणे , आता कुठेही नाही जाणार मी तुम्हा दोघींना सोडून...विनयने सानिका आणि राजश्रीला जवळ घेतलं. बाप लेकीच्या नात्यातला तिरस्कार संपून आता निर्मळ प्रेमाचा झरा तिथे वाहू लागला होता.


वैष्णवी कुलकर्णी

Comments