वैदू - गोष्ट एका सामान्य मुलीची ( Vaiju by Varsha Auti)
काय सांगू आपल्या वैजू बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. एकदम साधी राहणीमान, बोलका स्वभाव सगळ्यांना प्रेमाने जवळ करणारी, मन मिसळून राहणारी मुलगी. आई बाबाची शान तर मैत्रिणीचा जीव च आहे वैजू. नुकताच वैजूचा बारावीचा निकाल लागला . वैजू खूप आनंदी होती. नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन कॉलेज आणि नवीन स्वप्न या सगळ्या गोष्टीची तिला खूप उत्सुकता होती. वैजूने बी. एस. सी ( ऍग्री ) ला ऍडमिशन घेतलं होत.
शिक्षण घेऊन तिला स्वतः च्या गावातील माणसाला मदत करायची होती.वैजू ला गावाकडची माणसं, माती, झाडे, प्राणी, पक्षी, डोंगर, नद्या सगळं कस आपलं वाटायचं. तस होत ही तिचच सगळं पण फक्त लांब राहत होती एवढच. वैजू सध्या अहमदनगर मध्ये राहत होती. तीच मूळ गाव जवळच ऐक खेडे गाव होते. तिचे बाबा बँकेत नोकरी करायचे. वैजू वर्गामध्ये नेहमी पहिली येत होती. बाबाला तिचा खूप अभिमान वाटायचा.बघता बघता दिवस सरले अन कॉलेजचा पहिला दिवस आला.
वैजू - "आई, मला सकाळी लवकर उठव, उद्या कॉलेजला जायचे आहे."
आई - " बर बाई, झोप आता. "
वैजूला काही झोप लागलीच नाही. या कुशीवरून त्या कुशीवर तिने रात्र काढली होती. तिच्या जीवनाचा नवीन टप्पा उद्या पासून चालू होणार होता. नवीन कॉलेज लाईफ कस असेल यामध्ये ती रंगून गेली.
सकाळी उठून वैजू तयार झाली. आज बाबा तिला कॉलेजला सोडणार होते. शेवटी त्यांच्या नकटीचा पहिला दिवस होता न. वैजूच्या घरामध्ये ती, आई,बाबा, तिचा लहान भाऊ मिलिंद आणि आजी असे पाच जण राहत होते.
छोटंसं कुटुंब आहे तीच पण कुटुंबामध्ये नेहमी हसत - खेळत वातावरण असायच. त्यांच्या घरात सतत प्रसन्न आणि आनंदी वाटायचं. वैजूच्या मनामध्ये थोडी भीती आणि उत्सुकता पण होती. आपलं मन नेहमी नवीन गोष्टी, माणसं आणि परस्थिती स्वीकारायला लगेंच तयार होत नाही. वैजू कॉलेज मध्ये वेळेवर पोहचली होती. तिथे तिची ओळख सौम्या सोबत झाली . सौम्या दिसायला देखणी, बोलायला तिखट, खर्चासाठी चिकट आणि मेहनतीत प्रामाणिक होती. वैजूचा पहिला दिवस तसा चांगला गेला होता. नवीन पुस्तकं, वर्गमित्र आणि शिक्षक यांच्या ओळखीमध्ये गेला. वैजूचा कॉलेज, अभ्यास आणि वाचनालय यामध्ये दिवस जात होता. असाच तिचा दिनक्रम चालू झाला होता. ऐक दिवस वैजूला कॉलेज ला जायला उशीर झाला होता, त्यामुळे ती गेट मध्ये जाताच पळत सुटली होती. पळताना वाऱ्या सोबत तिचे केस खेळत होते, ओढणी उडत होती, ते सगळं सावरण्याच्या नादात ती एका मुलाला धडकली होती.
वैजू - " सॉरी, मी पाहिलं नाही तुम्हाला, चुकून धक्का लागला. "
प्रणव - "काही हरकत नाही, होत असं गरबडीमध्ये माणसाकडून." 'बर तुम्ही कोणत्या क्लास मध्ये आहात?'
वैजू काहीही न बोलता निघून जाते. ती स्वतः मनात बडबडत होती, किती वेंधळी आहेस, दिसत नाही का तुला वगैरे.
" प्रणव " नावातच नवीन्य आहे न! प्रणव दिसायला खूपच हँडसम होता. त्याची शरीर रचना खूपच सुडोल होती, तो बहुतेक रोजच व्यायाम करत असावा. रंग गोरापान, डोळे चमकणारे, उडणारे केस आणि उंची 6 फूट. त्याचा स्वभाव थोडा चिडका आणि रागीट होता. त्याचे बाबा बिझनेस आणि आई किटी पार्टी मध्ये बिझी असायची. त्याच्याकडे पैसा पाहिजे तेवढा होता पण प्रेमाची मात्र खूप कमी होती म्हणूनच तो चिडका आणि रागीट बनला. त्याचा मूळ स्वभाव मदत करणारा, दुसऱ्या बद्दल दया वाटणारा होता. असं म्हणतात ना देव सगळ्यांना सगळं काही देत नाही, काही ना काही कमी ठेवतोच, त्यामुळे तर जीवनाची किंमत आपला कळते. जीवन जगण्यासाठी ध्येय मिळते.तसंच काही प्रणव च्या बाबतीत होतं. त्याला पैसा पाहिजे तेवढा मिळत होता पण प्रेम मात्र मित्रांमध्ये थोडफार मिळायच. त्याला नेहमी वाटायचं या पैश्या पेक्षा माझी माणसं माझ्याजवळ असती तर माझं जीवन खुपच सुखी झालं असत. सद्या प्रणव त्याच्या पप्पाच्या बिसनेस मध्ये मदत करायचा. पप्पाचा बिसनेस आंतरराष्ट्रीय करण हेच त्याच ध्येय होत.
ऐक दिवस प्रणव बाईकवरून जात होता. बाईकचा स्पीड थोडा जास्त होता. त्याला जास्त स्पीड ने गाडी चालवायला आवडायची. जात असताना त्याला जाणवलं कि बाईकला ब्रेक लागत नाही. बाईक सावरता सावरता तो पडला. त्याला थोडा मार लागला होता. तो ज्या रस्त्यावर पडला तो रस्ता वैजूच्या घरा समोरून जात होता. त्यांचवेळी वैजू वाचनालयातून घरी जात होती. तिने पाहिलं कि कोणी तरी गाडीवरून पडले आहे. प्रणव तसा तिच्या ओळखीचा नव्हता, पण अडचणीमध्ये असल्या माणसाला मदत करण हे तिच्या रक्तातच होत. तिने त्याला मदत केली आणि हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर आले आणि सगळं ठीक आहे फक्त हाताला आणि पायाला थोडं फॅक्चर आहे म्हणले. वैजू प्रणवला भेटायला त्याच्या रूम मध्ये जाते.
वैजू - " आता बर वाटत आहे का? "
प्रणव - " हो, मी आता ठीक आहे. " ' थँक्स! कितीजण होते तिथे पण सगळे मोबाईल मध्ये शूटिंग काढण्यात व्यस्त होते, पण तुम्ही पुढे येऊन मला मदत केली खरंच खूप आभारी आहे.'
वैजू - " आओ, आभार कसले मानतायेत, माणसांनीच माणसाची मदत केली पाहिजे न! माझे बाबा नेहमी म्हणतात, जनसेवा हिच ईश्वर सेवा. "' आरे यार उशीर झाला मला घरी जायला आई बाबा वाट बगत असतील. अच्छा निघते मी, तुम्ही काळजी घ्या.'
प्रणव - " तुमच नाव कळू शकेल का? मी प्रणव आहे. "
वैजू - " माझं नाव वैजू आहे. तुमच्या घरी कळवलं आहे, तुमचे घरचे येतच असतील. मी निघते आता. चला बाय. "
वैजूचे आई बाबा दारात वैजूची वाट बघत उभे होते.
त्यांना वैजूची काळजी वाटत होती. ती दिसताच त्यांच्या जिवात जीव आला. आईने तर दारातच प्रश्नाचा भडीमार चालू केला.
आई - " कुठे होतीस तू? काय झालं? तू ठीक आहेस न? असे अनेक प्रश्न ती विचारात होती. "
वैजू - " आई, मी ठीक आहे. मला काही झालं नाही. चल घरात,तुला सगळं सांगते. "
शेजारच्या माने काकू काय झालं याचा कानोसा लांबूनच घेत होत्या. माने काकू खूपच संशयची वर्तीच्या होत्या. वैजूने त्यांच्या कडे बघताच त्या घरात निघून गेल्या.
ते सगळे घरात येतात. वैजू आईला आधी पाणी देते, कारण तिची अवस्था, काळजी तिला कळतं होती. वैजू पाणी पिते आणि आई बाबाला सगळी हकीकत सांगते. ते सगळं ऐकून आई बाबाला वैजूचा अभिमान वाटतो. आई मात्र वैजूला चांगलीच ओरडते, तुला साधा ऐक फोन करता आला नाही. इथे माझ्या मनात नको त्या शंका येत होत्या.मला तुझी किती काळजी लागली होती. भीतीने सारखा माझ्या पोटात गोळा येत होता. 'मन जे चिंती ते वैरी न चिंतीत ' अशी माझी अवस्था झाली.
बाबा - " सरकार थांबा थोडं, ती आली न घरी केवढ बोलताल, तिला लक्षात नसेल राहील. "
आई - " एकदा वयात आलेल्या मुलीची आई व्हा मग कळेल तुम्हाला कसले कसले विचार मनात येतात."
वैजू - " बर सॉरी न आई ! इथून पुढे अशी चूक होणार नाही. खरंच सॉरी. मला कळते ग तुझी काळजी! "
आई - " ह्म्म्म! आता जेवयला चला. "
सगळे जेवण करतात आणि झोपायला जातात. वैजू, मिलिंद आणि आजी हे एकाच रूम मध्ये झोपत असतात. वैजूला सगळ्या दगदगीमुळे झोपच येत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर होते . आजी आणि मिलिंद जागेच असतात.
आजी - " काय ग वैजू, झोप येत नाही का? "
मिलिंद - " तिला त्या हिरोची आठवण येत असेल. "
( मिलिंद तिची चेस्टा करत असतो )
वैजू - " गप रे झोप तू गपचूप. अंग आजी माझं डोकं दुखत आहे म्हणून झोप लागत नाही. "
आजी - " ये इकडे तुझ्या डोक्याची तेलाने मालीश करून देते. "
वैजू - " आजी नको ग! तुला उगाच त्रास कशाला? "
आजी - " त्रास काय त्यात, आन चल तेल इकडे. "
वैजू - " खूप बर वाटतेय ग आजी. आता निवांत झोप लागेल."
2
दोन, तीन दिवसांनी वैजू प्रणवला भेटायला जाते. आता तो बऱ्या पैकी बरा झाला होता. तिने जाताना काही फुल नेली होती. त्या फुलाच्या सुगंधाने रूम मधले वातावरण खूप ताजेतवाने झाले होते.
वैजू - " काय रे, कसा आहेस? "
प्रणव - " एकदम ठणठणीत बरा आहे. "
वैजू - " जेवण केलास का?
प्रणव - " हो. आताच हरी काका डब्बा घेऊन आले होते."
वैजू - " डॉक्टर काय म्हणले? मी येऊ का त्यांना भेटून?
प्रणव - " काही गरज नाही.दोन, तीन दिवसांनी सुट्टी होईल. डॉक्टर आताच तपासून गेले. "
वैजू - " ओके "
या काही दिवसामध्ये दोघांची खूपच छान मैत्री जमली होती. वैजूचे आई - बाबा प्रणवला भेटायला हॉस्पिटल मध्ये आले. त्यांना भेटून प्रणवला खूप छान वाटलं. त्यांनी प्रणवला घरी जेवण्यासाठी आमंत्रित केल.
( एक दिवस प्रणव वैजूला कॉलेजमध्ये घेण्यासाठी आला. )
प्रणव - " वैजू, चल लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. "
वैजू - " अरे, प्रणव काय झालं नीट सांगशील का? तू इथे कसा काय? कोणाला काय झालाय? "
प्रणव - " वैजू तुझ्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेले आहे, तू चल लवकर. "
वैजू - " बाबाला काय झाले? "
प्रणव - " त्यांना हार्ट अटॅक आलाय, ते आय. सी. यु. मध्ये आहेत. "
वैजू - " आईने मला का फोन केला नाही? "
प्रणव - " तुझा फोन लागत नाहीय म्हणून काकूने मला फोन करून तुला घ्यायला पाठवलं आहे. "
वैजू - " काय? तू मजाक तर करत नाही ना? "
प्रणव - " नाही ग वैजू, चल लवकर. "
वैजू - "चल "
वैजू हॉस्पिटलमध्ये पोहचते. तिला बघताच आई रडायला लागली. वैजू पण रडायला लागली पण तिने स्वतःला सावरलं. घरच्या सगळ्यांना सांभाळायची जिम्मेदारी वैजूवर होती. घरात सद्या तीच मोठी, समजूतदार आणि खंबीर होती. वैजूला खूपच टेन्शन आलं होत. " या परिस्थितीला कस सामोरे जावं हे तिला कळत नव्हते. तिला वाटायचं बाबाला काही झालं तर ती जगूच शकणार नाही. ती देवाकडे सतत प्रार्थना करत होती की बाबाला वाचव."
मेडिकल आणि डॉक्टर या दोन्ही गोष्टी प्रणवच सांभाळत होता. वैजूला प्रणवची खूप मदत झाली. या कठीण काळात त्यांची मैत्री खुपच घट्ट झाली. शेवटी कठीण काळात जे साथ देतात तेच तर खरे मित्र असतात. ( डॉक्टर बाबाला तपासून बाहेर येतात, वैजूच्या तर काळजाचे ठोके वाढ्यायला लागतात. )
डॉक्टर - " पेशंटची तब्बेत सिरीयस आहे. त्यांना व्हेंटिलेटर वरती ठेवावं लागणार. "
वैजू - " ठीक आहे डॉक्टर, ठेवा तुम्ही त्यांना व्हेंटिलेटर वरती, बिलची काळजी नका करू. फक्त ते लवकर ठीक झाले पाहिजे. "
वैजूच्या बाबाला व्हेंटिलेटरवरती ठेवल्याच कळल्यापासून नातेवाईकांच्या चकरा चालू झाल्या. नातेवाईक आले की वैजू च्या डोक्याचा अजूनच ताण वाढयचा. ते बाबाच्या तब्बेतीच कमी आणि प्रणव च जास्त विचारात होते. वैजू आणि प्रणव यांच्या मैत्रीबद्दल त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतला.
या जगात सगळं बदलेल पण एका मुलाच्या आणि मुलीच्या निर्मल मैत्रीबद्दलच मत कधीच नाही बदलणार. आपण लहानपणी चष्म्याचा खेळ खेळत असायचो. ज्यात लाल, निळा, हिरवा असे कलरचे चष्मे असायचे. आपण ज्या कलर चा चष्मा लावत होतो, त्याच कलरच जग आहे असं आपल्याला वाटायचं." जीवनामध्ये तसच असत जसे आपले विचार तसच सगळं आहे, असा माणसाचा भ्रम असतो. आपण जोपर्यंत आपला चष्मा चांगल्या विचारानी साफ करत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय आहे हे कळतं नसते. "
दिवसा मागून दिवस जात होते, पण बाबाची तब्बेत काही सुधारत नव्हती. वैजूची सगळ्यामध्ये मात्र खूप दमछाक होत होती. हॉस्पिटलचा खर्च आणि घरची जिम्मेदारी दोन्ही सांभाळताना वैजू शहरीराने नाही तर मनानेपण थकत होती. आतापरेंत तिने बाबाची एफ. डी. मोडून खर्च भागवला होता. तिच्याकडे जास्त पैसे शिल्लक नव्हते. प्रणव तिला पैश्याची मदत करत होता पण ती कितीवेळा त्याची मदत घेत राहणार. तिने पुढची परिस्थिती सांभाळण्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिने वर्तमानपत्रात जाहिरात वाचुन नोकरीसाठी अप्लाय केल. काही दिवसांनी इंटरव्यसाठी कॉल येत होते पण तिला मनासारखी नोकरी मिळत नव्हती.
एक दिवस वैजू गच्चीवर रडत बसली होती. प्रणव तिला फोन करतो पण ती काही फोन उचलत नाही. तो तिच्या घरी जातो.
प्रणव- " आजी, डब्बा झालाय का? "
आजी - " हो. "
प्रणव - " वैजू गेली का हॉस्पिटल ला ? "
आजी - " नाही, ती गच्चीवर आहे. "
प्रणव - " तुम्ही डब्बे भरून ठेवा, मी वैजूला घेऊन येतो. "
प्रणव गच्ची वर गेल्यावत बघतो की वैजूने रडून रडून खूप त्रास करून घेतला आहे. बाबा हॉस्पिटल मध्ये असल्यापासून ती व्यवस्थित जेवण करत नव्हती. तिची तब्येत खूप बारीक झाली होती. प्रणव तिच्या जवळ जातो, तिला खाली चल म्हणतो. ती प्रणवला बघताच अजूनच रडायला लागती.
वैजू - " प्रणव, बाबाची खूप आठवन येते. मला त्यांची अशी अवस्था बघावत नाही. बाबा घरात नाही तर सगळं घर कोलंमडून पडलेय. आईला मी कसातरी आधार देते पण माझं काय? माझं मन बाबा शिवाय कुठेच लागत नाही. "
प्रणव - " मी तुझी अवस्था समजू शकतो. तू नको काळजी करू, बाबा ठीक होतील. डॉक्टर प्रयत्न करत आहेत न. "
वैजू -' पण कधी?'
प्रणव - " तू असा धीर सोडू नकोस. आई, आजी आणि मिलिंद यांचा तरी विचार कर. "
वैजू - " त्यांच्या विचार करते म्हणून तर अशी गच्ची वर येऊन रडत बसले होते. "
प्रणव - " तुझ्या नोकरीच काय झालं? तू आज इंटरव्यू साठी गेली होती ना? "
वैजू - " हो पण काम झालं नाही? "
प्रणव - "तुला ऐक सुचवू का? "
वैजू - " बोल "
प्रणव - "तू माझ्या पप्पा ला बिझनेस मध्ये का मदत करत नाहीस? मी उद्या बोलतो त्यांच्याशी आणि कळवतो तुला. "
वैजू - " नको आरे,मी दुसरी नोकरी शोधते . "
प्रणव - " मी काय परका आहे का? "
वैजू - "तस काही नाही रे! "
प्रणव - " अंग वैजू, संकटामध्ये मित्र मदत नाही करणार तर कोण मदत करणार. "
वैजू - " ठीक आहे. "
प्रणव - " बर चल, आई हॉस्पिटल मध्ये वाट बघत असेल. "
वैजू - " हो चल "
आपल्या माणसांसोबत मनातलं दुःख बोललं तर किती मोकळ वाटत ना! तसच आता वैजूला वाटत आहे. बाबाची नकटी बाबाला खूप मिस करत होती. बाबांनी वैजूला लहानपणापासून खंबीर राहायला शिकवलं होत. नेहमी हसत खेळत राहणारी वैजू आता घरच्या जिम्मेदारी पार पाडत जिमेदार बनली होती. लहान वयातच ती खूप चांगल्या प्रकारे सगळं सांभाळत होती.
3
सगळं व्यवस्थित सांभाळत असताना बाकीचे लोक तोंडावर तिच कौतुक करायचे, माघारी मात्र खूप वाईट बोलायचे. त्यांना वैजू आणि प्रणव यांची मैत्री खटकट होती. त्या सगळ्यांना त्यांच काही चालू आहे असं वाटत होत. हे सगळं वैजूला कळत होत पण हिंदी मध्ये ऐक म्हणी आहे न, "हाथी चलता है, कुत्ते भोकते है! " त्याप्रमाणे ती त्यांच्या कडे दुर्लक्ष करत होती. तिला सध्या बाबाला ठीक करून घरी आणनं जास्त महत्वाचे वाटत होते. तिच्या घरच्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून तिला त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हाता.
माणसाच्या जीवनात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती? कोणासाठी पैसा, कोणासाठी मुले, कोणासाठी आरोग्य, कोणासाठी अजून काही असेल. ज्याच्या त्यांच्या विकारशक्ती नुसार वेगळी असू शकते. एका स्त्रीसाठी तिच चारित्र सगळ्यात मौल्यवान असत. या समाजातील काही लोक तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठीच जन्मला आलेले असतात. एखादी स्त्री खूप उशिरापर्यंत ऑनलाईन असेल, घरी नोकरीवरून येण्यासाठी उशीर झाला, एखाद्या मुलाला मोकळेपणाने बोलली, एकटी फिरली, फोन वर जास्त बोलली, सतत हसतमुख असली असे खूप काही आहे ज्यामुळे सरळ तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. यामुळे तर आपल्या घरी मुलीवर बंधने घातली जातात. लोक काय म्हणतील? असा प्रश्न तर जवळ जवळ सगळ्यांच्याय घरी निर्माण होत असतो. जो परेंत स्त्री लोकांना मान्य आहे तस जगते तोपरेंत ती चांगली असते. त्यांच्या विरुध्द वागली की वाईट होते. वैजू सध्या अश्याच परिस्थितीतुन जात होती.
वैजू आता बिझनेसमधल्या पुष्कळ गोष्टी शिकत होती. बाबाची तब्बेत बऱ्यापैकी ठीक झाली होती. ते लवकर घरी येणार होते. वैजू शिक्षण घेत, काम करून घर चालवत होती. वैजू रोज रात्री बाबाला भेटायला जायची. दिवसभर काय घडलं, तिने काय केल सगळं सांगायची. बाबाला नकटीच खूप कौतुक वाटायचं. त्यांची नकटी खूप समजुदार झाली होती .
बाबा - " नकटे, खूप त्रास होत आहे न तुला? "
वैजू - " नाही हो बाबा, त्रास काय त्यात माझं कर्तव्य आहे. "
बाबा - " मोठी झाली ग माझी नकटी. "
वैजू - " बाबा, घरी सगळे तुमची वाट बघत आहेत "
बाबा - " ह्म्म्म."
'नकटी ' हा शब्द त्यांच्या तोंडून ऐकतानी तिला आकाश ठेगणं होयच. आपल्या जवळच्या माणसांनी प्रेमानी दिलेले नाव त्यांच्या तोंडून ऐकताना खूप आनंद होतो. नकटी हा शब्द जरी वेगळा असला तरी वैजूसाठी तो पॉवर बँक होता. त्या शब्दामध्ये तिच्या बाबाच प्रेम, विश्वास आणि काळजी त्यात होती.
वैजू ऑफिसवरून घरी जात होती. आज तिला ऑफिस वरून निघायला थोडा उशीर झाला होता. सगळीकडे अंधार दिसत होता सूर्य मावळून चंद्र ढगाआड लपला होता. रिम झिम पाऊस येत होता. पावसा सोबत वाहणारा थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता. वैजूला बाबाची आठवन येते. आलं घातलेला चहा आणि बाबाच पेटीवरील संगीत अशी त्यांची मैफिल असायची. ती त्या आठवनीत रमते. तिच्या चेहऱ्यावर ऐक गोड हास्य येत.
तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि ती दचकते. प्रणवचे पप्पा आणि प्रणव घरी जात असतात. वैजू ऑटोची वाट बघत असते.
प्रणवचे पप्पा - " वैजू, तू अजून गेली नाहीस? "
वैजू - " नाही न काका, अजून ऑटो आला नाही. "
पप्पा - " चल तुला घरी सोडतो. "
वैजू - " नको काका, उगाच तुम्हाला त्रास कशाला? "
पप्पा - " त्रास कसला त्यात, आमची जिम्मेदारी आहेस तू. "
वैजू - " ओके काका चला. "
पप्पा - " हरी, मला घरी सोड आणि मग मॅडमला त्यांच्या घरी सोड. "
( थोड्यावेळाने प्रणवच्या घरी पोहचतात. पप्पा तिला घरी जेवण्यासाठी विचारता पण ती नंतर कधी येईल म्हणते. प्रणव तिला सोडायला तिच्या सोबत घरी जातो. ) बाहेर मस्त पाऊस पडत होता. गाडीमध्ये ' अधीर मन झाले........' हे गाणं चालू होत.तिला पावसात गरम गरम मक्याचे कणीस खायला खूप आवडत होते. रस्त्त्याच्या बाजूला ऐक कणीस वाला उभा होता. प्रणवने हरिकाकाला गाडी त्यांच्या जवळ उभा करायला सांगितली. रिम झिम पाऊस, गार गार वारा आणि गरम गरम मक्याचे कणीस मस्त वाटतेयन. गरम कणीसाला लिंबू आणि मीठ लावून खाताना स्वर्गातल्या पंचामृताची चव लागते न..... तुमच्या पण तोंडाला पाणी आलं न.... वैजू थोड्यावेळासाठी का होईना तिच्या समस्याने भरलेल्या जीवनातून बाहेर पडून आनंद घेते. बाबा हॉस्पिटल मध्ये असल्यापासून ती आनंद, हसण आणि जगणं सगळं विसरून गेली. तिला इतक्या दिवसानंतर आनंदी बघून प्रणव पण खूप आनंदी झाला. प्रणव म्हणला, " चला निघायचं का आता? " वैजू म्हणली, " हो चल खूप उशीर झालाय,आई वाट बघत असेल."
प्रणव वैजूला दारात सोडतो आणि निघून जातो. वैजू घरात जाते, तिला सगळं वातावण खूप वेगळच वाटत. आई चिडलेली दिसते. आई तिला बघते पण काही न बोलता निघून जाते. वैजू तिच्या रूम मध्ये जाते तिथे मिलिंद अभ्यास करत असतो.
वैजू - " मिलिंद, घरी काही झाल का? आई चिडली आहे का? "
मिलिंद - " हो ताई, आई तुझ्यावर चिडली आहे. तुला उशीर झाला म्हणून आई काळजी करत होती. तिला राहवलं नाही म्हणून ती दारात उभी होती. तिला शेजारच्या माने काकू भेटल्या, त्यांनी सांगितलं तू प्रणव बरोबर मक्याचे कणीस खात मज्जा करत फिरत आहे. त्या म्हणल्या, आज कालची काय ही तरुण पिढी, त्यांना माय-बापचा धाक तर कशाच नाही. वाटेल तेव्हा येतात, वाटेल तेव्हा जातात. आई - बाप इकडे काळजी उंबराठे झीजवतात. मूल - मुली बाहेर मित्रांसोबत मज्जा करत फिरतात. "
आई त्यांच्या बोलण्याने खूप दुखावली गेली. प्रणव आणि वैजूची मैत्री आधीच सगळ्यांच्या डोळयात सलत होती.त्यात वैजू उशिरापर्यंत बाहेर होती तर अजूनच तिच्याबद्दल वाईट विचार करत होते. " या समाजामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य कधी भेटणार? समजाला वाटत तस मन मारून जगल तर ती स्त्री चांगली आणि स्वतः च्या मनासारखं जगल तर वाईट हार्दिक विचार कितीपत योग्य आहे? छोट्या छोट्या गोष्टीचा संबंध सरळ तिच्या चरित्र्याशी जोडला जातो हे योग्य आहे का? मी सगळ्याच स्त्रिया बद्दल म्हणत नाही, काही स्त्रीया असतील ही समाजाला वाटतात तशा पण त्यात बाकीच्या स्त्रियांचा काय दोष आहे. वैजू तर तिच्या बाबाच्या प्रेमात आणि संस्कारात वाढलेली मुलगी आहे. मुळात त्या दोघांच लोंकाना वाटत तस काही चालू नव्हतं मग तरीही वैजूबद्दल असं मत का बनवलं असेल? एका मुलाची आणि मुलीची निर्मळ, खरी मैत्री असू शकत नाही का? मुळात मैत्री म्हणजे तरी काय ओ? ' रक्ताच्या नात्यापलीकडे एखादी व्यक्ती रक्तताच्या नात्यापेक्षा जवळची वाटण, तिच्या सोबत बोलून दुःख कमी होऊन मन मोकळ होणे, खचलेल्या परिस्थिती मध्ये खंबीरपणे उभे राहण्याच बळ येण. मनात शंका ण ठेवता पूर्णपणे विश्वास ठेवणे, संकटाच्या परिस्थिती मध्ये होरपळताना मायेची उब देणे, जीवन जागण्याची इच्छा नसतानाही जगण्यासाठी ध्येय निर्माण करून देणे. " माने काकूच बोलणं ऐकून वैजूला खूप वाईट वाटलं. ती आज खूप दिवसानंतर थोड्यावेळासाठी आनंदी झाली, पण तोच आनंद जास्त दुःख देऊन गेला . आई बाबाचा डब्बा घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली. ती वैजू सोबत ऐक शब्द पण बोलली नव्हती. वैजू यासागळ्याचा विचार करत जेवण न करता झोपी गेली.
वैजूच दुसऱ्यादिवशी ऑफिसमध्ये कुठेच लक्ष लागत नव्हत. तिची नेमकी चूक काय होती हा विचार तिच्या मनात सतत येत होता. आई तिला काहीच बोलली नाही म्हणून ती जास्तच दुःखी झाली. तिने लंच ब्रेक मध्ये बाबाला भेटायला जायच ठरवलं. तिला बाबाची आठवन येते. तिला या परिस्थिती मध्ये त्यांच्या खूप आधार होता.
4
आई रात्रीपासून नाराज होती. बाबाशी जास्त काही बोलत नव्हती. ती तिच्याच विचारात गुंग होती. बाबाला अंदाज आला की आई वर वर बोलत असली तरी तिच्या मनात काही तरी चालू आहे. बाबाने तिला विचारलं पण ती हसून टाळत होती. तिला बाबाच्या तब्बेतिची काळजी होती. बाबाला सगळं कळल तर त्रास होईल असं तिला वाटायचं. शेवटी बाबाने तिला शप्पथ घातली आणि सगळं विचारलं.
बाबा - " अंग, तुला माहित आहे न आपली वैजू कशी आहे ते मग कशाला कोणाच बोलणं मनावर घेतेस? "
आई - " तुमच म्हणणं खरं आहे, पण वैजू बद्दल कोणी वाईट बोललेलं मला सहन होत नाही. "
बाबा - " माझा नकटीवर पूर्ण विश्वास आहे. माझी नकटी काही चुकीचं करणार नाही याची मला खात्री आहे. तुला बघ कस वागायचं ते! "
आई -" रात्री चुकलं माझं, मला तिला बोलायला हव होत. तिला काय वाटलं असेल. "
वैजू बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. जगातील सगळ्यात बेस्ट आई - वडिलांची ती मुलगी आहे याचा तिला अभिमान वाटतो. तिने मनात स्वामींचे आभार मानले आणि जन्मोजन्मी हेच माझे आई बाबा आसू दे अशी प्रार्थना केली. वैजू आत येऊन बाबाला मिट्टी मारते. बाबा मला तुमची खूप आठवन येत होती म्हणून भेटायला आले.
वैजू - " बाबा, तुम्हला खायला काय आणू? "
बाबा - " नको नकटे, आताच जेवण केलाय. तू केल का जेवण? "
वैजू - " नाही, ऑफिस ला गेले की करते. "
बाबा वैजूला जवळ बसवतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. या मायेच्या स्पर्शाने तिचे डोळे भरून येतात. तिला खूप आधार आणि मानसिक समाधान वाटत. कितीतरी दिवसानंतर तिला असा क्षण अनुभवायला भेटला. " नकटे नको टेन्शन घेऊ, होईल सगळं ठीक. आता मी लवकर घरी येणार आहे सगळं पाहिल्यासारखं होईल. " वैजू हो बाबा म्हणते.
आई - " वैजू, सॉरी बेटा मी रात्री तुला न बोलताच निघून आले. "
वैजू - "ओके आई, सॉरी नको म्हणून. "
आई - " ह्म्म्म "
वैजू - " आई, तू जेवण केल का? "
आई - " नाही, जेवते थोड्यावेळाने. "
वैजु - " बरर चला मला उशीर होतोय निघते मी. "
आई - " हो जपून जा बेटा. "
बाबा - " नकटे, पोहचल्यावर फोन कर. "
वैजू - "हो बाबा, तुम्ही काळजी घ्या. रात्री येईल भेटायला. "
बाबा - " प्रणवला घेऊन ये. "
वैजू - " हो बाबा. " हसते आणि बाय म्हणून जाते.
वैजू ऑफिस मध्ये पोहचते. ती आता खूप आनंदी असते. जीवनात आधार देणारे बाबा सोबत असले की समस्या कितीही मोठी असू दे, त्याच्याशी लढण्यासाठी दहा हत्तीच बळ अंगात येत. " सत्य परस्थिती जाणून न घेता दुसऱ्याच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणे हे एका मूर्ख आणि नीच माणसाचे लक्षण आहे. " ही गोष्ट तिच्या लक्षात आली त्यामुळे ती मूर्ख माणसाकडे दुर्लक्ष करून परत आपल्या ध्येयकडे लक्ष देते.
जीवनात वैजूला वेगवेगळे अनुभव येतात. त्या अनुभवातून ती खूप काही शिकत होती. वैजू नेहमी दुसऱ्याचा विचार करायची. घरात कोणाला काय हव काय नको ते सगळं बघायची. वैजू सध्या दोन्ही वेगवेगळ्या परस्थितीतून जात होती. बाबा घरी येणार म्हणून आनंदी आणि दुसरी म्हणजे पैसे कसे जमवायचे या टेन्शन मध्ये होती.नातेवाईक भरपूर होते पण मदत करायला कोणी तयार नव्हते, कारण घरात कोणी कर्ता पुरुष नव्हता. वैजू आता च घरची जबाबदारी पार पडायला लागली होती. आपले पैसे बुडाले तर असा विचार करत होते. नातेवाईक नुसते नावे ठेवायला आणि मज्जा बघायला असतात. फुकटचे सल्ले देणे तर त्यांना चांगलाच जमत, पण लढावं तर आपल्यालाच लागत.
वैजूला बाबाच्या बँकेत कर्ज काढायची कल्पना सुचली. आईला विचारून तिने सगळे कागद पत्र दिले. पण तिला जामीनदार काही भेटत नव्हते. जामीनदार कोण होईल? असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. समस्या सुटत आहे असं वाटलं की नवीन समस्या वैजू पुढे दत्त म्हणून उभा राहत होती. वैजू पण हार मानणारी नव्हती. तिने प्रयत्न चालू ठेवले. तिच्या ओळखीच्या प्रत्येकजणाकडे तिने मदत मागतली. सगळेच तिला बघतो, सांगतो, फोन करतो अशी उत्तर देत होते. वैजूच्या पायचे फिरून फिरून तुकडे पडले, ती थोडी विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडीच्या थंडगार सावली असलेल्या झाडाखाली बसली. जवळच ऐक दुकान होते तिथून तिने वडापाव आणि पाणी बॉटल घेतले आणि झाडाखाली खात बसली. आता तिला थोडे बरे वाटत होते. ती झाडाला टेकन देऊन ऐक टक समोर बघत होती. ती पूर्णपणे शून्यात हरवली होती. त्यात तिला कधी डोळा लागला कळलच नाही.
वैजू थोड्यावेळाने कसलातरी आवाज ऐकून गडबडीने जागी झाली. ती आजूबाजूला बघते की काय झालं? तिला एका कारचा अपघात झालेला दिसतो. त्यात ऐक व्यक्ती जागीच ठार आणि दुसरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते. हे सगळं पाहून तिच्या काळजाचा ठोकाच
चुकतो. असा अपघात तिने प्रत्येक्षात कधीच पाहिलेला नव्हता. तिने लगेंच ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. तो पन्नासीतला प्रौढ व्यक्ती दिसत होता. त्या व्यक्तिच रक्त काही केला थांबत नव्हत. वैजूने त्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिन केल्या नंतर आईला फोन करून सगळं कळवलं. त्या व्यक्तीला तात्काळ रक्ताची गरज होती पण हॉस्पिटल मध्ये रक्तच उपलब्ध नव्हते. बाहेरून रक्त येण्यासाठी वेळ लागणार होता. त्या व्यक्तिची कंडिशन खूपच सिरीयस झाली होती. त्याची जिवंत राहण्याची शक्यता सेकंदा सेकंदा कमी होऊ लागली. वैजूची त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तळमळ चालू होती. तिच्या लक्षात आलं की तिचा रक्तगट 'O+' ( ओ पॉसिटीव्ह ) आहे. तिची तब्बेत कमजोर असल्यामुळे डॉक्टरनी रक्त घेण्यासाठी नकार दिला. पण वैजूला त्या व्यक्तीचा जीव वाचवन जास्त महत्वाच वाटलं. " कोणत्याही परिस्थिती मध्ये सगळ्या गोष्टीचे भान ठेवून जो योग्य निर्णय घेतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. " त्या व्यक्तीच्या जीवाला आता काहीच धोका नव्हता. हे ऐकून वैजूला खूप बर वाटलं. ती आता थोडी निवांत झाली आणि थोड्यावेळाने घरी गेली.
5
वैजू दाराजवळ चक्कर येऊन खाली पडते. कसला तरी आवाज आल्याने मिलिंद आणि आजी बाहेर येतात. वैजू त्यांना बेशुद्ध पडलेली दिसते. ते तिला घरात नेऊन पलंगावर झोपवतात. मिलिंद पळत जातो आणि पाणी घेऊन येतो. आजी वैजूच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून जागी करते. आजी मिलिंदला चहा आणि बिस्कीट आणायला सांगते. आजीला वाटत, पोरीला खूप दगदग, टेन्शन आणि बाबाच्या दुखण्यापासून पोटभर जेवण असं कसच नाही म्हणून चक्कर आली असावी. मिलिंद चहा आणि बिस्कीट घेऊन येतो.
आजी - " वैजू, ऊठ बर ऊठ. किती दगदग करशील पोरी! गरमा गरम चहा घे बर बाळा, तुला बर वाटेल. "
वैजू - " ह्म्म्म! दे इकडे चहा. "
आजी - " बर वाटतेय का गं पोरी "
वैजू - " हो गं आजी, पार्लेजी खाऊन शक्तिमान झाल्यासारखं वाटतेय. "
आजी - " काय अवस्था करून घेतलीय पोरी, जरा स्वतः कडे लक्ष देत जान. "
वैजू - " आजी, तस काही काळजी करण्यासारखं नाही ग! ठीक आहे मी. थोडी चक्कर आली एवढच. "
आजी - " तुला कस काय चक्कर आली."
वैजू - " पहिल्यांदाच रक्तदान केल न म्हणून. "
आजी - " तुला हे मध्येच कस काय सुचल रक्तदान करायचं. काही गरज होती का रक्तदान करायची, आधी स्वतः ची तब्बेत तर बघायची. "
वैजू -" आजीला झालेल सगळं सांगते. "
आजी - " गुणाची गं माझी बाई! "
वैजू रात्री डब्बे घेऊन बाबाला भेटायला जाते. आई - बाबाला सगळा घडलेला प्रकार सांगते. बाबा वैजूला शाबासकी देतात, आई तिची नजर काढुन टाकते. वैजू बाबाला कर्जा विषयी सांगते. तिला जामीनदार भेटत नाही म्हणून त्यांच्या ओळखीचे कोणी मदत करणारे आहेत का विचारते? बाबा तिला दोन - तीन जाणाचे नंबर देतात आणि त्यांना भेटायला सांगतात. वैजू आज बाबासोबत जेवण करते आणि घरी येते. वैजूला रात्री काही झोप येत नव्हती. तिला काही करून परवा पेरेंत पैश्याची व्यवस्था करायची होती. डॉक्टर नी तिला बाबाला परवा डिस्चार्ज देणार सांगितलं. ती उद्या बाबांनी सांगितलेल्या लोकांना भेटणार होती, पण त्याची काही मदत होईल असं तिला वाटत नव्हते.
तिने प्रणवला मदत मागितली असती तर त्याने सगळे पैसे दिले असते. याआधी प्रणव ने वैजूला खूप मदत केली, तिला सारख त्याला पैसे मागण बरोबर वाटत नव्हतं.
वैजू दुसर्यादिवशी सकाळी लवकर उठली, सगळं आवरून बाहेर पडली. शेवटचा प्रयत्न म्हणून ती सकाळपासून सगळ्यांना फोन करते, भेटते पण तिच्या पदरी निराशाच पडते. वैजू खूप टेन्शन मध्ये होती. तिला काय करावं काही कळत नव्हत. ऑफिस मध्ये गेली खरं पण तिच लक्ष कामात लागत नव्हत. तिने सुट्टी टाकली आणि ऑफिसच्या बाहेर पडली. तिला बाबांनी दिलेल्या नंबर ची आठवण झाली. ती फोन करून सगळ्यांना भेटत होती. यासगळ्यामध्ये तिचा पूर्ण दिवसही गेला आणि पैश्याची व्यवस्था झाली नाही. रोज रात्री वैजू बाबाला भेटायला जायची आज काही गेली नाही. बाबाने वैजूची आठवण काढली पण आई ला वाटल ती दमली असेल तर झोपली. वैजू रात्री जेवण न करताच तशीच रूम मध्ये गेली. वैजू खूप अस्वस्थ होती, तिला काय करावं हेच कळतं नव्हत. तिला बाबाची वाक्य आठवली, " डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. काय करावे हे कळत नसेल तर डोळे बंद करून अशांत मनाला शांत करून एकाग्र करावं आणि थोडा विचार करावा मार्ग आपोआप मिळतो. " मन शांत करण्यासाठी ती हेडफोन लावून गाणे ऐकत होती. त्यामध्ये तिला कशी झोप लागली काही कळलच नाही.
सकाळी सकाळी तिला जग येते, पाहते तर काय सगळीकडे उजडलं होत. वैजू दचकून उठते आणि आवरायला लागते. तिने ऑफिस ला सुट्टी टाकलेली असते. ती डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जाते आणि डॉक्टरला भेटते. बाबाच्या तब्बेती विषयी सगळं विचारते. बाबा ठणठणीत बरे असल्याचे कळल्यानं वैजूला खूप आनंद होतो. फक्त त्यांना कुठलाच मानसिक ताण देऊ नका असं डॉक्टर सांगतात.
वैजू - " डॉक्टर, ऐक विनंती करायची होती. "
डॉक्टर - " बोला ना. "
वैजू - " डॉक्टर, माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीत, आहेत तेवढे भरले तर चालतील का? मी नंतर राहिलेले भरून टाकेन. "
डॉक्टर - " सॉरी, मी तुमची यामध्ये काही मदत करून शकत नाही, हॉस्पिटल चे नियम मला पण मोडतात येत नाही. "
वैजू - " प्लीज डॉक्टर "
डॉक्टर - " पूर्ण पैसे जमा करा आणि मग पेशंट ला घेऊन जा. "
वैजू - " ओके "
वैजू आई - बाबाला भेटते आणि थोड्यावेळाने येते म्हणून सांगते. हॉस्पिटल पासून थोडं दूर ऐक बाग होती. तिथे लहान मुलं खेळत होती. वैजू त्या बागेत जरा वेळ बसली. ती विचार करत होती काय करावं? कुठून पैसे आणावेत? आता नाहीविलाजन का होईना तिला प्रणव कडून पैसे घ्यावे लागणार होते. ती लगेच प्रणवला भेटायला ऑफिसमध्ये गेली. पण दुर्भाग्य काही तिची साथ सोडायला तयार नव्हते. प्रणव आणि त्याचे पप्पा अर्जेंट मीटिंग साठी परदेशात गेलेले असतात. इथे पण तिच्या हाती निराशाच आली. तिला वाटलं प्रणव म्हणत होता तेव्हा पैसे घेतले असते तर बरर झालं असत. एवढ्या साऱ्या नकारा नंतर पण तिने हार मानली नाही. ती अजून दुसरीकडे काही व्यवस्था होते का बघते? आपण जर वैजूच्या ठिकाणी असतो तर लगेंच नकारात्मक विचार करत बसलो असतो. आपण थोडी जरी निराशा आली, मनासारखं नाही घडलं, अपयश आलं तर लगेंच आपलं अमूल्य असं जीवन संपवन्याचा विचार करतो . तस न करता माणसाने कितीही नकार आले तरी आपल्या ध्येयावर ठाम राहील पाहिजे. जो ठाम राहतो तोच यशस्वी होतो. वैजूला आईचा फोन येतो.
आई - " वैजू, कुठेस तू येना लवकर घरी. "
वैजू - " काय झालं गं आई, तू घरी आली आहेस का? "
आई - " बाबा तुझी वाट बघत आहेत. ते इतक्या दिवसांनी घरी आलेत आणि तूच घरी नाहीस. "
वैजूला आश्चर्य वाटत. ती पटकन घरी जाते आणि बघते तर काय खरच आई- बाबा घरी होते. आई,आजी, मिलिंद, बाबा सगळे आनंदी दिसत होते. वैजूने बाबाला घट्ट मिट्टी मारली. बाबाला एवढे आनंदी बघून तिचा आनंद गगणात मावत नव्हता. वैजू त्यांच्या सोबत बसली पण बिल कोणी भरलं याच विचारात हरवली. तिच्या आयुष्यात काही चमत्कार घडला की काय तिला वाटत होत. मन किती वेड असत न! नाही त्या कल्पना करत. म्हणून तर संत सांगून गेलेत, मन हे वाऱ्यापेक्षा चंचल आहे, त्याला नेहमी चागल्या कामात गुंतवूण ठेवा. वैजूला राहवतच नाही, ती बाबाला विचारते.
वैजू - " बाबा, एक विचारू का? "
बाबा - " बोल न नकटे, परवानगी कसली मागतेस. "
वैजू - " बाबा, हॉस्पिटलच बिल तुम्ही भरलं का? "
बाबा -"नाही गं नकटे. "
वैजू - " मग कोणी भरलं. "
बाबा - " मला वाटलं तू भरलं. डॉक्टर आले आणि तुम्ही जाऊ शकता म्हणले. तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.
वैजू - " बिल "
बाबा -" बिल पण क्लिअर आहे म्हणले. "
सगळ्यांना आश्चर्य वाटत बिल भरलं कोणी? तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजते. वैजू दरवाजा उघडते आणि त्यांना बसायला सांगते. वैजू त्यांना पिण्यासाठी पाणी देते.
वैजू - " सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. "
ग्रहस्थ - " मी हॉस्पिटल मधून आलो आहे तुमच बिल मी भरलं आहे. "
वैजू - " धन्यवाद. खूप आभारी आहे, पण तुम्ही ओळखत नसून ऐवढी मदत कशी काय केली. "
ग्रहस्थ - " धन्यवाद तर मी तुम्हाला म्हणायला आलो. "
सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, कोणालाच काही कळतं नाही.
ग्रहस्थ - " तुमच्या मुलीने माझ्या बाबाचे प्राण वाचवले. काल ज्याचा अपघात झाला ते माझे वडील आहेत. तुमच्या मुलीने त्यांना वेळेवर हॉस्पिटल मध्ये नेलं आणि रक्त देऊन त्यांचा जीव वाचवला. तुमच्या मुलीचे खूप उपकार झाले आमच्यावर. "
वैजू - " काका, धन्यवाद कसले, मी माझं कर्तव्य केल. माणसाने माणुसकी नाही जपायची तर कोणी जपायची तर कोणी जपायची. अडचणीत असल्या माणसाला मदत करणे हेच माणसाच परम कर्तव्य आहे. जन सेवा हिच ईश्वर सेवा. "
ग्रहस्थ - " खरं आहे तुझं म्हण पण आजकाल कुठे कोन मदत करत. सगळे फक्त स्वार्थ बघतात. "
वैजू - " हो तुमच बरोबर आहे. "
ग्रहस्थ - " तुझे बाबा ज्या हॉस्पिटल मध्ये होते ते आमच हॉस्पिटल आहे. बाबांनी तुझं सगळं बिल माफ केल आणि हे तू भरलेले पैसे परत करायला सांगितले."
वैजू - " नको, काका "
ग्रहस्थ - " घे गं, बाबांनी तुला गिफ्ट दिलाय ठेव. "
वैजू - " काका, चहा घ्या. "
ग्रहस्थ - " बाबांनी तुला भेटायला बोलावलं आहे. त्यांना आपल्याच हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलाय. "
वैजू - " हो, उद्या येते. "
चहा पिऊन ते ग्रहस्थ निघून जातात. हे सगळं बोलणं शेजारच्या माने काकू ऐकत होत्या. त्यांनी वैजू ची माफी मागितली. वैजूबदल आपण खूप उलट सुलट बोललो याचा त्यांना पश्चताप झाला. ऐवढी चागली मुलगी आपण तिच्या बद्दल खूप वाईट विचार केला याची त्यांना लाज वाटत होती.
वैजूच्या जीवनातील सगळी संकट जवळजवळ संपली. बाबा घरी आले, पैश्याची समस्या सुटली. तिचा चांगुलपणावर अजूनच विश्वास वाढला. बाबाला गर्व वाटेल अशी त्यांची नकटी वागली होती. तिच्या बद्दल सगळ्यांची मत या एका घटनेने बदलून गेली. ' दगडालाही देवपण येण्यासाठी टाक्याचे घाव सोसावेच लागतात. ' नकटीच्या जीवनात जेवढी संकट आली, तेवढ्याना तिने धैर्य, हुशारी, जिद आणि विश्वास यांच्या मदतीने पार केली. काही दिवसांनी सगळं पूर्ववत झालं. बाबा बँकेत जाऊ लागले.त्यांनी घरची सगळी जबाबदारी घेतली. वैजूचा पहिला दिनक्रम चालू झाला. ती मध्ये मध्ये प्रणवच्या बिसनेस मध्ये मदत करायला जायची. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबाचा नकटीवर पूर्ण विश्वास होता. कोणी काही म्हणलं तरी त्यांचा नकटीवरचा विश्वास डगमगला नाही, हिच तिची खरी ताकद होती. नकटी पण बाबाच्या विश्वासाला तडा जाईल असं वागली नाही.....
- वर्षा घेवारी औटी.



Comments
Post a Comment