तिचा निर्धार - सौ. रजनी चाटे (Ticha Nirdhar by Mrs Rajni Chate) Marathi story
" कविता तुझ्यासाठी एक स्थळ आलंय",नमिता म्हणाली.कविता थोडीशी लाजली,येऊ दे मला काय? मी आत्ताच लग्न नाही करणार. " अग पण मुलगा तरी पाहिलास का? खूप सुंदर आहे म्हणे, देखणा,उंचपुरा आणि विशेष म्हणजे नौकरी आणि घर दोन्ही बाजूंनी जबरदस्त पैसेवाला".
कविता थोडीशी चिडून म्हणाली मला नाही फरक पडत मला अजुन शिकायचंय जॉब करायचाय. पण मनातून तिला सुद्धा उत्सुकता कोण असेल ?कसा असेल?
कविता ही घरची लाडकी ,दिसायला सुंदर, निटास,हुशार.आणि मनमिळाऊ.वडिलांनी विचारल बोलावू का मुलाकडच्याना? ती लाजून हो म्हणाली.
पाहुणे आले मुलगा राजबिंडा ,कविताला तर खूप आवडला आणि मुलगाही एकटक तिच्याच कडे पाहत होता. ती लाजून चूर झाली.नकळत गोड स्वप्न रंगवत होती.पाहुण्यांनी तिला पाहिले,काही प्रश्न विचारले.ती आधुनिक विचारांची काम करून पायावर उभी राहण्याची तिची मनस्वी इच्छा.
सर्वांनी शेवटी होकार दिला.पण मुलगा पैसेवाला म्हणून हुंडा पण खूप देण्यात आला.कविताला ते पटलं नाही पण तीच प्रेम जडल होत त्याच्यावर म्हणून मन मानत नसतानाही आई वडील तयार झाल्यामुळे तीही तयार झाली..भेटी गाठी वाढत गेल्या, दोघे आता जणू एकमेकांना सोडून राहूच शकत नव्हते. पण हळू हळू त्यांच्या मागण्या वाढत गेल्या, प्रकरण खूप पुढे गेल्यामुळे तिचे घरचे सुद्धा एक एक मागणी पुरी करत गेले.
तिला हे सर्व पाहून अस्वस्थ व्हायला लागलं.पण एकीकडे जीव गुंतला होता ना! लग्नाची तारीख ठरली ,सर्वांना कळवण्यात आल.मित्र- मैत्रिणी चिडवत होती, आता काय बाबा राजकन्येला राजकुमार घेऊन जाणार.तिचे गुलाबी स्वप्न जणू साकार होत होते.
आलोक सुद्धा आता तिच्या सारखं मागे मागे फिरायचा तिला कधी कॉफी साठी तर कधी डिनर साठी न्यायचा.लग्नाची तारीख जवळ आली त्यांच्या मागण्या पूर्ण करताना वडिलांची तर अगदी दमछाक झाली.पण करणार काय? लग्न तर जवळ आले.
आज लग्नाचा दिवस कविता नटून अगदी अपसरेसारखी दिसत होती.मनात धडधड वाढली, मंडपात जाण्याची तयारी...ती झुकलेली नजर,ते लाजून लाल झालेले गाल,मनातली धाकधूक.सर्व काही स्वप्न जणू.ज्या क्षणाची ती कित्येक वर्षांपासून वाट पाहत होती तो क्षण आला.
तो मंडपात तिची वाट पाहत उभा होता.ती अलगद पावले टाकत त्याच्या जवळ आली..विधिना सुरुवात झाली आज ती अलोकची होणार एका कुमारिकेपासून ती सौभाग्यवती होणार..कितीतरी स्वप्न,मनातून बावरलेली ती त्याला वरमाला घालणार तेवढ्यात कोणीतरी बोलले.." मुलाला कार पाहिजे त्याला बायकोला फिरवायला नको? ऑफिस मध्ये पण इम्प्रेशन पडेल.
तिच्या हातून वरमाला गळून पडली.आई वडील तर कोसळलेच.हात जोडून म्हणाले आता शक्य नाही होणार सांभाळून घ्या, लग्न पार पडून द्या एका वर्षांनी देऊ कार.पण नाही ते आत्ताच अडून राहिले.कार मिळाली तरच लग्न होईल नाहीतर वरात परत जाणार........
तीच मन सुन्न झालं.आसव गळू लागली.हाच का तो ? ज्याच्याबरोबर तिन सुखी संसाराची स्वप्न रंगवली.पण याच्या तर अपेक्षाच संपत नाही.
आणि हा असाच मागण्या करत राहिला तर? नाही ती निर्धाराने उठली आई वडिलांची इज्जत राहण्यासाठी केवळ ती त्याला स्वीकारू शकत नव्हती ... तिन आसव पुसली आणि ती चालू लागली....भरलेला मंडप सोडून....
सौ रजनी अतुल चाटे



Comments
Post a Comment