सिमांतनी - भारत सोनवणे ( Simantani by Bharat Sonavane) marathi story

 हळदीने हात पिवळे झाले, लग्न झाले अन् नवतीचे नऊ दिवस संपले. एकोणिशीची सिमांतनी आता दिवसभर कामाच्या अन् तिच्या संसाराच्या गराड्यात गुंतून गेली होती. गावाकडल्या साल दोन साल लग्न झालेल्या टिपिकल बायकांप्रमाणे, तीही कामं करू लागली. दिवसभर रोजंदारीने लोकाच्या वावराला खुरपणी, निंदणी करू लागली...

 

ऐन तारुण्यात केलेलं पदार्पण अन् अंगावरील संसार नावाच्या एका परंपरेत स्वतःला झोकून देऊन ती दिवसभर कामं उपसायची अन् रात्री ऐन तारुण्यात आलेला तिचा दादला तिला घटकेभरचाही उसंत द्यायचा नाही... चार - सहा महिने मागे पडले. ऐन सुगीच्या दिवसात ती, तीन महिन्याची पोटुशी असताना तिला कळलं अन् घरात आनंदाला पारावर उरला नाही.
 
कुणाच्या मनात घटकाभरही हा प्रश्न आला नाही की, एकोणिशीची सिमांतनी या सर्व गोष्टींना सामोरं जाईल का? तिला इतक्या लहान वयात आलेलं बाळंतपण झेपेल का? शेवटच्या काही महिन्यातलं सावरणं तिला स्वतःला जमेल का? प्रश्न खूप होते, पण सर्व प्रश्नांना एकच उत्तर होतं!
 
ती काही जगाच्या पाठीवर न्यारी नाही, तिच्या मायला जमलं, तिच्या सासूला जमलं अन् आता तिच्या अठरा वर्षाच्या नंदेला जमलं.

मग तिला का नाही..?

दिवसा मागून दिवस जात होते. सिमांतनी आता सहा महिन्यांची पोटूशी होती. एकोणाविसाव्या वर्षी वाळक्या अंगकाठीच्या सिमांतनीच्या पोटाचा घेर, नववा महिना चालू असल्यागत दिसत होता.चालताना फारवेळ चाललं की तिला आता धापा लागू लागली. पण परसदारच्या छोट्या आडातून पाणी शेंदून आणणं तिला चुकायचं नाही. इतकाच काय तो दिलासा तिला मिळाला होता की, कंबरेवर घेऊन येणारी कळशी आता, तिला तिची सासूबाई आणून देत नव्हती. मात्र डोईवर असलेला हंडा मात्र काही केल्या तिच्या नशिबातून या अवस्थेलासुद्धा खाली पडला नव्हता.
 
सांजेच्या वेळी अंगणातील सारवासारव आवरली की, सिमांतीनी हातपाय धुवून, वेणीफणी करून, डोक्यात भांगेच्या मधोमध सिंदूर भरून, चंद्रकोर टिकली कपाळावर लावत, अंगावर घातलेल्या काठ नववार लुगड्यासारख्या साडी चोळीत ती, अक्षरशः सौंदर्यवती दिसायची अन् आता त्यास भर म्हणून पोटूशी असल्यामुळे पुढे आलेला पोटाचा घेर. या दिसण्याला अगदी कुणाची नजर लागावी इतकी ती सुंदर दिसत होती. दिवसभर इतकं सर्व काम करूनही सिमांतीनी सांजेच्या या वेळेला, अक्षरशः देवीच्या चेहऱ्यावर असलेलं तेच तिच्या चेहऱ्यावर घेऊन यायची.
 
अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनात तेलाचा दिवा ठेवून, तो सदैव तेवत राहील याची खात्री करून, ती वृंदावनाभोवती तीन प्रदक्षिणा घालून, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार घालत, आतल्या घरात यायची अन् सासू सासऱ्याच्या पाया पडायची.
 
जसं अंधारून यावं तसं अग्निदेवी तिची वाट बघत असावी, अशी चुल्हांगण पेटवायला वाळलेली लाकडे घेऊन यायची अन् संसाराच्या या रहाटगाड्यात अगदी जाणत्या संसारी स्त्रीसारखी चुल्हीला पेटवायची. दादल्याला, सासू – सासऱ्यांना कोऱ्या चहाचं आदण चुल्हीवर ठेवायची, उकळून उकळून पार काळा झालेला चहा, जवा ती कपात ओतायची तेव्हा, त्यातून निघणारी वाफ साऱ्या घरात मिरायची अन् तो सुगंध साऱ्या घरात फेर धरायचा.

मग तिचं एका हातानं नथीचा झुबका सावरत चहा पिणं व्हायचं अन् तिच्या दादल्याचं तिला प्रेमानं न्याहाळणं.

अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र, कोरा चहा घशाखाली नेऊन सोडला अन् सिमांतनीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन् सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली.
 
पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती. यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं. त्याला पर्याय नव्हता. काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्तास तरी सुटका झाली होती.
 
सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती. मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा. भांडी हिसळत असतानाचा आवाज अंगणातून महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या.

घमिल्यात असलेल्या पाण्यात, पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता, कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली. दिवसभरच्या कामामुळे तिच्या कंबराला हल्ली कळ लागलेली जाणवायची. सडपातळ बांधा असलेली ती उंच असल्यानं अन् कंबर आधीच इतभर असेल, त्यात या दिवसभरात अंगावर येणारे काम, दिवसभर कसेतरी ती रेटत करायची.

सांजेच्या प्रहरी कंबर दम मारायची नाही अन् कधी एकदा धरतीला पडते असं सिमांतनीला व्हायचं. भांडे घासूस्तोवर तिच्या सासूबाईनं, चुल्हंगणावर पिठलं करायला टाकलं होतं. दगडी खलबत्यात लसूण-मिरचीच्या कुटून केलेल्या ठेच्याचा, परतल्याचा वास साऱ्या घरात मावत होता. त्या ठसक्यात तिच्या सासऱ्याला खोकल्याची उबळ आली अन् म्हतारा, म्हतारीच्या आई बापांचा उद्धार करत पडवीत येऊन बसला...


लोखंडी डब्ब्यात असलेलं पीठ लाकडी परातीत घेऊन सिमांतनी, भाकरी बडवत बसली. एकिकडे लालबुंध झालेला चुल्हीचा अंगारा अन् त्यावर भाकरी शेकत, भाकरी करणं चालू होतं. दुसरीकडे पिठलं आळत होतं. पिठलं आळत असतानाचा आवाज सिमांतनीला खूप आवडायचा. मग ती न चुकता अशावेळी भाकरी बडवायला बसायची.
 
भाकरी झाल्यावर सिमांतनीचा दादला, सासरा, म्हतारीवर कोकलतच भाकरी खायला बसली. एकीकडे सिमांतनी भाकरी बडवत होती अन् तिची सासूबाई डोक्यावरचा पदर सावरत, बाप लेकाला वाढून देत होती. दोघेही जेवत होती. त्यांचे उरकले अन् मग दोघी सासू-सूना भाकर खायला म्हणून बसल्या...

एकीकडे दोघी भाकर खात होत्या, एकीकडे सिमांतनीचा दादला चौकटीजवळ बसून तिला न्याहाळत, आईशी रानातल्या गप्पा हानत बसला होता. म्हातारा आपला बिडी शिलगुन पडवीत असलेल्या रेडूवर, आठ वाजेच्या बातम्या ऐकत झुरके मारत बसला होता.

भाकर खावून झाली. उरलेली कामं आवरून सिमांतनी चुल्हीचा आहार विझवायला म्हणून माजघरात आली अन् बघती तर काय चुल्हीच्या एकांगाला ठेवलेल्या तव्यावर असलेला विस्तव चांदवं पडल्यागत हसत होता. सिमांतनी त्याच्याकडे बघून आपल्या वाढत्या पोटाकडे बघत मनातच हसू लागली अन् कितीवेळ त्या तव्याकडे बघू लागली. पल्याड असलेल्या वळकटीतून तिचा दादला तिचं हे सुंदर सौंदर्य बघत होता अन् ती तो खुलून गेलेला हसरा तवा...

रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली. तिच्या जोडीला आता सासूबाई, भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती.

एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता. बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं. तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता, काळा पडला होता, खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती. सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून, अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो कधी दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत, सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता.

दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे, त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही.

अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दिवसांत तरी आपल्याकडून हे शब्दांचे प्रेम मिळावे म्हणून तो प्रयत्नशील असायचा. गेले काही दिवस ते दोघेही हा प्रेमाचा सहवास अनुभवत खुश होते, त्यातच येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल, बाळाचा विषय निघाला की दोघेही या आनंदाने, कल्पनेने खुश होवून जायचे.

सिमांतनीचे भांडी घासून झाले अन् तिने सासूबाईंना बैठकीच्या खोलीत रजई अंथरून त्यावर अंथरूण टाकून दिले. झोपेच्या वेळेला लागणारा लिंबाचा काढा देऊन सिमांतनीने सासूबाई झोपी गेल्यावर, थंडी वाजू नई म्हणून सिमांतनीच्या आईनं दिलेली रघ सासूबाईंच्या अंगावर टाकून, तिनं मोहरल्या दारचे कडी कोंडे लावून दिवा मालवला अन् ती झोपायला म्हणून तिच्या खोलीत गेली...

अजूनही तिचा दादला तिची वाट बघत लोळत पडला होता. ती आल्याचं बघून त्यांना एक मंद स्मित हास्य देत तिच्याकडे अन् एकवार तिच्या पोटाकडे बघत त्याने तिला बसायला खूनवले. हिवाळ्याचे दिवस असल्याने घरावरचे पत्रे पार गारठून गेले होते अन् कुठं कुठं ते रीसायलासुद्धा लागले होते.
 
आता दोघेही अंथरुणावर अंग टाकून गप्पा मारत बसले होते. गप्पांचा विषय काय असावा..?

आपल्या बाळाचे आयुष्य अन् त्याचे भविष्य कसे उज्वल ठरेल, त्याला शहराच्या शाळेला टाकायचं राहील म्हणून लागणारा पैका अन् त्याचं नियोजन कसं करायचं अन् होणारं बाळ कुणावर असेल यावर तर, त्यांचे प्रेमळ वाद नियमित होत असायचे. दोघेही वयाने लहान असल्यामुळे कदाचित असेल पण, आईबाप होण्याची दोघांना लागलेली चाहूल अलिकडे त्यांना शहाणं करत होती अन् यामुळे आपसात असलेलं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते.

दिवभरच्या थकव्यातून रात्रीच्या झोपे अगोदरच्या त्यांच्या या रोजच्या गप्पा त्यांना त्यांचा थकवा विसरायला भाग पाडायच्या. बराच वेळ झाला होता अन् दोघांनाही आता झोप येत होती, म्हणून दोघेही अंगावर पांघरून घेऊन झोपले होते.

फळीवर ठेवलेली चिमणी विझू की मिनमिनू करत होती अन् याच उजेडात दोघेही झोपी गेले होते. आता दोघांची सावली एक झाली होती अन् त्यांच्या आयुष्यातील एक रात्र जसा सूर्य अस्ताला जावा तशी अंधाराकडे कलत उद्याच्या उजेडाकडे निघाली होती.

सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचणाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले. सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल, हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं...
 
आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी, असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती...

सांच्याला जेवणं आवरून, सिमांतनीची सासू भांडे घासून तिने, सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं.

थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते. तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बरं वाटत होतं.

सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासूबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता. म्हाताऱ्याच्या गौऱ्या म्हसणात गेल्या, पण म्हातारा काही डोक्यात आला नाही, असं म्हणत सासूबाई तिच्या लेकाचे एक अंगाला अंथरूण घालत होती अन् तिचंही.

सिमांतनीच्या या आडीनडीच्या रात्रीला म्हणून तिची सासूबाईसुद्धा आता तिच्या जवळ पहुडली होती...

बाहेर अंधारून आलं होतं, काळोख चहूकडे पडला होता, वाहत्या नदीतून थंड्या पाण्यात वाहणाऱ्या वाफा मात्र दरवाज्यातून दिसू लागल्या होत्या. झोपायला म्हणून सिमांतनीचा दादला चार लोकाचे घरं पुंजून ओसरीला आला, कडाक्याची थंडी वाजत असल्यानं त्यानं पेटीतून सिमांतनीचे तिच्या माहेरून मायना दिलेलं सेटुर काढून घालायला म्हणून सिमांतनीला दिलं अन् सिमांतनीचा चेहरा खुलून आला.
 
तोही आता त्याच्या आईच्या अन् बायकोच्या पायथ्याला अंथरलेल्या अंथरुणाला झोपला. रोजचा एक दिवस आजही कलला होता, सिमांतीनीचे बाळंतपण पुन्हा एक दिवसाने जवळ आले होते. आत मात्र त्याची त्याला चिंता सतावत होती, तिचं असलेलं कमी वय अन् तिला हे सर्व सोसल का? या विचाराने तो या उश्यावरून त्या उश्यावर आपली कुस बदलत होता...

काळोख आधिकाधिक गडद होत चालला होता. यात कमी की काय म्हणून फळीवर असलेल्या दिवा आता विझायला करत होता अन् एका वख्ताला तो विझला, घरात सर्वत्र काळोख झाला होता...

सासूबाई निवांत पहुडली होती, सासरा अधूनमधून खोकलत बरतळत होता, सिमांतनीचा दादला आता मस्त काळोखाच्या राती घोरत होता.

थंडी अजून वाढत होती, नदीला असलेलं मोप पाणी अन् चहुकडे असलेली हिरवळ त्यामुळे या सालाला नेहमीपेक्षा जास्तीची थंडी जाणवत होती. देऊळात कीर्तन, अभंग चालू होती टाळ, मृदंग, पखाचा आवाज सिमांतनीच्या कानापहुर येत होता अन् ती हे सर्व मन लावून ऐकत होती.

तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होत होता की, काय म्हणून ते पोटातल्या पोटात रांगल्यासारखे करत होते अन् हे सुखद क्षण अनुभवत सिमांतनी निपचित देवाचा धावा करत अंथरुणात मायनं दिलेलं माहेरचं सेटुर घालून निपचित पहुडली होती, निपचित पहुडली होती.


कोजागिरी होऊन आठ दिवस सरले होते, अशाच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती.

अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती. इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरून घाम फुटला होता, सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासूबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळून गेले.
 
तिला हे कळून चुकले होते की, होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरू शकेल, म्हणून तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या. या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटू लागलं, तो स्वत:ला कोसत होता, जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती, होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढू लागल्या होत्या.

ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली अवस्था बघून खोकलतच त्यांच्या बायकोला शिव्या देत, लेकाला म्हणू लागला मर्दा जा लवकर मांगवाड्यातून सुईनीला घेऊन ये.

काळ जवळ आला हाय, एकतर तू बाप होणार नायतर अवघड होणार तुझी कसोटी हायसा जा.

सिमांतनीचा दादला हे ऐकताच घराच्या बाहेर पडला एकीकडे, सिमांतनीचा एक जीव येत होता एक जात होता, तिच्या दादल्याला मात्र काय करावं सूचना झालं होतं. अनवाणी पायांनी तो मांगवाड्याच्या वाटेना मांगवाडा घाठण्याचा प्रयत्न करत होता, अंधारी रात्र असल्याने काळोखात समोर काहीही दिसेना झालं होतं.
 
वाटेतून अंदाज काढीत तो धावत होता, प्रत्येक पावलागणिक त्याला सुईनीचं घर दूर भासत होतं अन् यात घात झाला एका धोंड्याला त्याचा पाय धडकला, ठोकर बसली अन् डोक्यात पार आतपर्यंत ती कळ त्याला झोंबली. नखाचे टकूर निघून बाजूला झालं होतं, पण आता आपलं दुखणं बघणं त्याला योग्य वाटत नव्हतं कसाबसा लंगडत धावत तो मांगवाड्यात सुईनीच्या घराला पोहोचला. कावडावर हातानं ठोकत त्यानं सुईनीला आवाज दिला कावड उघडलं तसं सुईनीनं त्याचा चेहरा बघून अवस्था ओळखली अन् ती तिचं गाठुड घेऊन त्याच्या संगत सैरावैरा पळू लागली.

अखेरला दोघेही घरला पोहोचले, सुईनीनं सिमांतनीच्या दादल्याला अन् त्याच्या म्हाताऱ्याला परसदारच्या खोलीत थांबायला लावलं अन् कावड लावून घेतलं आत सिमांतनीच्या वाढणाऱ्या प्रसववेदना, वाढणाऱ्या कळा अन् तिला होणार त्रास बघून तिच्या सासूबाईचं अर्ध आवसांन गळून पडलं होतं, पण तिला धीर द्यायला म्हणून ते हे सर्व रेटत तिला धीर देत होती, सुईन तिच्या योग्यतेप्रमाणे प्रयत्न करत होती.
 
बाहेर सिमांतनीच्या दादल्याला एक-एक क्षण एक-एक काळासारखा झाला होता, तो गुडघ्यात मान घालून आपली आसवे ढाळत बसला होता. सिमांतनीचा सासरा बिड्या फुकित काळजीनं परसदारच्या खोली महोरल्या अंगणात येरझऱ्या घालत होता.

या सर्व दांगुड्यात गल्लीतले सारे लोकं जागी झाली अन् सिमांतनीच्या कुडाच्या घरासमोर तिची या त्रासातून सुटका होण्याची वाट बघू लागली होती. अंगणात शेकोटी पेटली होती. थंडी मी म्हणत होती. गल्लीतल्या बायका आपआपले बाळंतपणाचे दिवस आठवून एकमेकांना सांगत होत्या.

काही तासभराने बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आला अन् सिमांतनीच्या दादल्याच्या डोळ्यातील धारा खंडल्या. तो वर मान काढून कावरीबावरी नजर करत इकडं तिकडं बघू लागला. सिमांतनीची यातून सुटका झाली हा विचार करून अंगणात जमलेल्या बायका सुखावल्या. अंगणातील माणसं सिमांतनीच्या दादल्याच्या गळ्यात पडू लागली अन म्हणून लागली,

‘लका आम्हाला नातू झालासा तू बाप झाला हायसा.’

पण या आनंदामागे बाळाच्या ओरडण्यामागे सिमांतनीचा आवाज मात्र तिच्या दादल्याच्या कानावर पडेना झाला होता. अंगण पुन्हा एकदा शांत झालं, इतकं शांत की गावात घोंघावणारा वारा आता स्पष्ट ऐकायला येऊ लागला होता, बाळ जन्माला आलं पण बाळंतणीचं काय झालं ती बेसुध हाय का?

हे मात्र कळंना झालं होतं.

दहा-पाच मिनिटानं कावड उघडलं, सुईनबाई अन् सिमांतनीची सासूबाई हातात बाळ घेऊन बाहेर आली. सुईनीनं लुगड्याच्या पधरानं आपलं रडू लपवत तिथून काढता पाय घेतला अन् काही विपरीत घडल्याचं गल्लीतल्या लोकांना कळून चुकलं.

 
सिमांतनीचा दादला त्याच्या आईजवळ जाऊन लेकाला बघत बोलला,

‘मायव सीमांतनीचा आवाज का येईना झालं हायसा, ती झोपली हाय का? अन् तू थंडी वाऱ्याच तुझ्या नातवाला घेऊन का बाहेर आली हायसा?’

सिमांतनीच्या सासूबाईंन तिच्या नातवाला तिच्या नवऱ्याकडे दिलं. सिमांतनीचा सासरा त्याच्या नातवाला बघून बोळक्या झालेल्या गालातून गालातल्या गालात हसून त्याच्याकडे बघू लागला.

अन् इतक्यात होत्याचं नव्हतं झालं, सिमांतनीच्या सासूबाईनं मोठ्यानं तोंड झोडत स्वतःला शिव्या द्यायला सुरुवात केली.

म्या कैदाशिनीनं माझ्या लेकाच्या संसाराचं वाटुळं केलं, माझ्या सुनबाईला म्हसणात नेऊन घातलं.

हे ऐकून सिमांतनीचा नवरा रडतच कावड उघडून आतल्या खोलीत गेला. सिमांतनी बाजीवर निपचित पडून होती. ती तिच्या लेकाला अन् तिच्या दादल्याला सोडून कायमची निघून गेली होती. सिमांतनीचा दादला तिच्या गळ्यात पडून मोठ्यानं हमसून हमसून रडत होता. त्याला हळदीत नटलेल्या सिमांतनीपासून मरणासन्न अवस्थेत पडलेली सिमांतनी डोळ्यांना दिसत होती.

सिमांतनीचा सासरा डोळ्याला पाणी येत नसतानाही सुनेच्या जाण्याच्या दुःखात नातवाला सांभाळत रडू लागला होता. गल्लीतल्या साऱ्या बायकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या. गावावर शोककळा पसरली होती. गावची सून गावानं गमावली होती हे खूप दुःखद होतं.

 
अंधारी रात्र सरून पहाटेचं तांबडं फुटलं. सूर्योदय झाला. सिमांतनीच्या माहेराला खबरबात गेली. तेही आले अन् सिमांतनीला अखेरचा निरोप देण्यात आला.

दुःखाचं मूळ सिमांतनीच्या सासू सासऱ्याला कळून चुकलं होतं. आपल्या लेकाचं कमी वयात केलेलं लग्न अन् सूनेला न झेपणाऱ्या वयात आलेलं बाळंतपण तिला नाही झेपलं अन् सिमांतनीनं आपल्याला पिढीचा वारस, वंशाला दिवा देऊन आपला प्राण त्यागला.

पुढे सिमांतनीचा दादला विदुर म्हणून गावाभर भटकत राहिला अन् मायविना पोरकं झालेलं पोर माय शिवाय,मायच्या प्रेमाशिवाय आपलं जीवन जगत राहिलं.

Comments