ऑनलाईन ऋणानुबंध - वैष्णवी कुलकर्णी (online runanubandh - Vaishnavi Kulkarni)

रसिका चित्रे ,एक तरुण यशस्वी लेखिका , कवयित्री म्हणून प्रसिद्ध होती. गोरीपान ,नाजूक चाफेकळी नाक असलेली रसिका. तिचे लेख , कविता , कथामालिका रोज निरनिराळ्या वृत्तपत्रांतून , मासिकांमधून छापून येत असत. तसेच अनेक ठिकाणी प्रमुख पाहुणी , स्पर्धांसाठी परिक्षिका म्हणून तिला आमंत्रण असे. एका महाविद्यालयात मराठीची प्रोफेसर म्हणून ती काम करत होती.

      साहित्य हे तिचं पहिलं प्रेम असलं तरी आपल्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या प्रेमाची देखील ती वाट पाहत होती. आपल्या कलासक्त आयुष्याचा साथीदार देखील अस्सल कलाप्रेमी, एक लेखक असावा आणि साहित्यसागरात दोघांनीही मनसोक्त विहार करावा अशी रसिकाची मनापासून इच्छा होती. त्यामुळे तिचे आई बाबा तिच्यासाठी तसेच स्थळ शोधत होते.

   एका निवांत संध्याकाळी गच्चीत बसून रसिका लॅपटॉपवर एक नवी रचना करण्यात गुंतली होती. तितक्यात तिला तिच्या फेसबुकवर श्रीरंग सोमण नावाच्या एका तरुण मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.रसिका कधीही कुणा अनोळखी मुलाची अथवा मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नसे. त्यामुळे ही रिक्वेस्ट देखील ती डिलीट करणार तितक्यात त्या मुलाच्या प्रोफाईलवर असलेल्या एका सुंदर चारोळीने रसिकाचे लक्ष वेधले गेले. त्या चारोळीचे शब्द होते :

मोकळ्या निरभ्र आभाळाखाली त्या पडला जणू चांदणसडा ,

लाखमोलाचे तुझे हे हास्य पाहुनी सखे जीव होई थोडा थोडा !

   ती चारोळी वाचली अन् का कुणास ठाऊक परंतु रसिकाच्या मनाला वाटू लागले की ह्या मुलासोबत मैत्री करायला काही हरकत नसावी. जो ध्यास रसिकाचा होता , तीच आवड श्रीरंगची देखील दिसून येत होती आणि त्याच्या चारोळीने रसिका भारावून गेली होती. लगेचच रिक्वेस्ट घ्यायला नको म्हणून तिने रात्रीपर्यंत त्याला प्रतीक्षा करायला लावली.

    जेवणं झाली आणि रसिका पुन्हा लॅपटॉप घेऊन बसली. काही कथा , कविता वाचता वाचता तिला अचानक संध्याकाळी आलेल्या श्रीरंगच्या फ्रेंड रिक्वेस्टची आठवण आली. रिक्वेस्ट अजून तशीच होती. काही क्षण विचार करून तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि श्रीरंगची प्रोफाईल पाहिली. अनेक चारोळ्या , निसर्ग कविता ह्यांनी त्याचे अकाऊंट भरून वाहत होते.

   प्रथम तुझा स्पर्श होता मोरपीसे नाचली होती मनात,कसे तुला सांगू सखे दिसतेस तूच तू मला चंद्र अन् चांदण्यांत !

उत्तुंग दरी अन् विपुल वृक्षराजी ह्यांच्या सानिध्यात बांधावे घरकुल ,  

 मिळता सुख सहवास या निसर्गाचा , सुख येई टाकत आपले पाऊल!

रसिका साऱ्या रचना वाचण्यात दंग झाली होती तितक्यात तिच्या मेसेंजर वर एक संदेश आला. श्रीरंगने तो पाठवला होता.

श्रीरंग : धन्यवाद , माझी फ्रेंड रिक्वेस्ट घेतल्याबद्दल.

रसिका : मी आत्ता तुमच्याच चारोळ्या वाचत होते. तुम्हीही छान लिहिता.

श्रीरंग : प्रयत्न करतो मी , परंतु तुमच्यासारखे जमत नाही मला. तुमचे लेख , कविता वाचतो मी वृत्तपत्रांमधून. खूप सुंदर परीक्षण असते तुमचे प्रत्येक विषयाचे.

रसिका : धन्यवाद. तुम्ही पुण्यातच असता ना , कुठे राहता ?

श्रीरंग : कर्वे नगर आणि तुम्ही ?

रसिका : मी सहकार नगरला असते. एस. पी. कॉलेजमध्ये मराठी शिकवते. तुम्ही..?

श्रीरंग : मी पूर्णवेळ लेखक म्हणूनच काम करतो. आमच्या कॉलनीमधल्या उदयोन्मुख लेखक संघाचा मी सदस्य आहे आणि आमच्या सोसायटी मधील मुलांना मराठी शिकवतो.

रसिका : छान वाटलं , माझ्यासारखं मला कुणीतरी भेटलं , लेखक , कवी असलेलं.

श्रीरंग : मला देखील तुमच्या सारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची ओळख परिचय झाल्याने खूप छान वाटलं. अच्छा , शुभ रात्री.

रसिका : शुभ रात्री.

  रसिकाच्या अपेक्षांमध्ये चपखल असा मुलगा अजूनतरी सापडत नव्हता. जे स्थळ यायचे त्यांना लेखणी , साहित्य यांत रमायला कधी आवडले तर वेळ नसायचा आणि वेळ असेल तर लेखन क्षेत्राची फारशी आवडच नसायची. त्यामुळे मग नाईलाजाने अनेक चांगल्या स्थळांना रसिका नकार देत असे.

    रसिकाची लेखणी दिवसेंदिवस बहरत चालली होती आणि तिकडे श्रीरंगच्या लेखणीचे तेज सर्वत्र फांकत चालले होते. आता तो देखील काही वृत्तपत्रे , मासिके ह्यांतून आपल्या लेखणीची जादू चोहीकडे फैलावत होता. दर आठवड्यातून एकदा तरी रसिका आणि श्रीरंग एकमेकांसोबत तासंतास साहित्याच्या विश्वात रमत असत. तालेवार लेखक - कवी मंडळींच्या गप्पांत रंगले असताना दोघांनाही वेळेचे भान उरत नसे. 

    आताशा रसिका आणि श्रीरंग दोघांनाही एकमेकांसोबत बोलणे झाल्याशिवाय करमेनासे झाले होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा रंगणारी त्यांची साहित्य मैफिल आता दोन दिवसाआड रंगू लागली. इतक्या दिवसांच्या भरघोस गप्पांनंतर एक साहजिक मोकळेपणा दोघांच्याही मैत्रीत आला होता. त्यामुळे श्रीरंगने रसिकाची काही हरकत नसली तर व्हॉट्सॲप नंबर द्या असे रसिकाला विनवले. तिनेही आढेवेढे न घेता लगेच आपला नंबर श्रीरंगला दिला.

    तिला इतक्या दिवसांनंतर आज पहिल्यांदा श्रीरंगाचे दर्शन घडत होते. रंगाने थोडा सावळा परंतु प्रामाणिकपणाची झाक चेहऱ्यावर झळकत असलेला , काळ्याशार डोळ्यांचा आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचा असा होता श्रीरंग. आता श्रीरंग आणि रसिकाच्या मुक्त मैफिली व्हॉट्सॲप वर रंगू लागल्या. 

   एकदा एका नवोदित कवींच्या कविता सादरीकरण स्पर्धेसाठी परीक्षिका म्हणुन रसिकाला आमंत्रण होते. रसिका १५ मिनिटे आधीच कार्यक्रमस्थळी पोचली. तिथे पोचली अन् तिने पाहिले....कार्यक्रमस्थळी सगळी तयारी जातीने हजार राहून एक व्यक्ती करत होती आणि ती व्यक्ती होती , अर्थात श्रीरंग. त्याला तिथे पाहून रसिकाला आश्चर्याचा खूप सुखद धक्का बसला.

रसिका : श्रीरंग , तुम्ही इथे...?

श्रीरंग : हो , आमच्या लेखक संघानेच आजची ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि अध्यक्ष महाशयांना मीच तुमचे नाव परिक्षीका म्हणून सुचवले होते.

रसिका : आपण कालच तर बोललो , तुम्ही काही बोलला नाहीत मला..

श्रीरंग : बोललो असतो तर आज तुम्हाला हा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला पाहून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा टिपता आला असता मला..?

   यावर रसिका मनमोकळी हसली. यथावकाश स्पर्धा पार पडली. तिथे उपस्थित सारेच जण स्पर्धेसाठी श्रीरंगने केलेल्या उत्तम नियोजनाचे आणि रसिकाच्या उत्तमोत्तम साहित्याचे कौतुक करताना थकत नव्हते. त्यामुळे ती रात्र दोघेही अतीआनंदाने झोपलेच नाहीत.

         श्रीरंगच्या मनातली रसिकाच्या मैत्रीची जागा निर्व्याज प्रेमाने घेतली होती , रसिका त्याला मनापासून आवडू लागली होती आणि एकदा स्वतंत्र भेटून तो रसिकाला रीतसर लग्नाची मागणी घालणार होता. त्यानुसार फोनवर गप्पा मारत असताना त्याने एकदा आपण बाहेर कुठेतरी भेटूया अशी इच्छा रसिकाकडे व्यक्त केली. रसिकाच्या मनात देखील श्रीरंगची जादू हळूहळू पसरत चालली होती. त्यामुळे तिने येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आपण वैशालीला भेटू असे श्रीरंगला कळवले.

      पिवळा सलवार सूट घातलेली , केस मोकळे सोडलेली रसिका साध्या वेशात देखील अतिशय सुंदर दिसत होती. जुजबी गप्पा झाल्यानंतर श्रीरंगने सरळ विषयालाच हात घातला. 

श्रीरंग : रसिका , खरंतर आज मी तुला वेगळ्याच एका कारणासाठी भेटायला बोलवलं आहे. इतके दिवस आपण छान मित्र म्हणून बोलतो आहोत , भेटलो आहोत पण....

रसिका : पण काय...

श्रीरंग : रसिका , तुझ्यासारख्या हुशार ,नामवंत लेखिका , कवयित्रीला यापुढे मला केवळ मैत्रीण नाही तर एका पत्नीच्या रुपातली मैत्रीण म्हणून भेटायला खूप आवडेल.

    रसिका गोड लाजली. तिच्या मनात तिचा आयुष्यभराचा साथीदार म्हणून श्रीरंगने कधीच जागा मिळवली होती. त्यामुळे तिचा देखील होकार होताच.रसिका सारखी हुशार आणि कर्तबगार मुलगी सून म्हणून येणार , श्रीरंगच्या आयुष्यात आपल्या साहित्याचे आणि प्रेमाचे रंग भरणार या कल्पनेने श्रीरंगचे आई बाबा देखील खूप आनंदित झाले.

     सगळीकडे शोधून शोधून दमलेल्या रसिकाच्या आयुष्यात जोडीदाराचे ऑनलाईन जुळलेले श्रीरंग आणि रसिकाचे ऋणानुबंध अखेर एका सुयोग्य मुहूर्तावर अतिशय धूमधडाक्यात बद्ध झाले.

- वैष्णवी कुलकर्णी.

 

Comments