मनात राहून गेलेली राखाडी साडी - वैष्णवी कुलकर्णी

अगं दमु , किती दमशील ? 🤣जरा उसंत घे गं , एवढी दगदग कशाला करतेस ? वाढत्या वयानुसार आता थकवा येतो तुला ,डायबीटीज बिपीचा त्रास पुन्हा आहेच मागे लागलेला...



" अहो , नका काळजी करू एवढी , काही होत नाही मला....आपण घरात राहत असताना आपल्याला सगळीकडे काटेकोरपणे स्वच्छता हवी असते , मग ती आदिमाया जगदंबा येणार आहे , आपली लेकरं , पियूष आणि प्रियंका देखील येतील , तेव्हा घराची सफाई नको का व्हायला ? आणि आता झालंच आहे सगळं आवरून. आता कपाटं तेवढी आवरली की झालं...


"मायबाई , आता कपाटं मी आवरून घेतो. संध्याकाळचे ६ वाजत आलेत. तू आता जरा फ्रेश हो अन् आपल्यासाठी मस्त फक्कड असा चहा टाक."


"बरं , आलेच मी. "


तर अशी ही आज सकाळपासून दमयंतीताईंची घर , खोल्या आवरण्याची लगबग सुरू होती. नवरात्र जवळ आले होते ना ! मग घटस्थापना करायची , आई जगदंबेचे स्वागत करायचे तर घरात सगळीकडे स्वच्छता हवी म्हणून हा सगळा खटाटोप ! घरात राहणाऱ्या व्यक्ती दोनच : दमयंतीताई अन् त्यांचे यजमान अनिरुद्धराव. त्यांचा एकुलता एक मुलगा पियूष हा नोकरीनिमित्ताने न्यूयॉर्कला त्याची पत्नी प्रियंका समवेत स्थायिक झाला होता. पण तरीदेखील नवरात्र आणि दिवाळीसाठी तो महिनाभर सुट्टी काढून भारतात आवर्जून येत असे.


    घरात हे दोघेच राहत असले तरी दमयंतीताईंना प्रत्येक सणवाराचे अतिशय अप्रूप होते. त्यादिवशी घरात स्वच्छता करणे , सजावट करणे ही कामे त्या अत्यंत आवडीने करत असत. मग स्वतःला दगदग जरी झाली तरी त्याचे त्यांना वैषम्य न वाटता आनंदच होत असे. अनिरुद्धराव देखील त्यांना जमेल तेवढी मदत करीत असत. दमयंतीताई चहा घेऊन खोलीत आल्या तेव्हा अनिरुद्धराव कपाटं आवरण्यात गुंग झाले होते.


"हं , घ्या चहा घ्या ".


"दमयंती , अगं केवढ्या साड्या आहेत तुझ्या... हे बघ , अर्धं कपाट तर तुझ्याच साड्यांनी व्यापलं आहे. लाल , पिवळी , केशरी , जांभळी , निळी , गुलाबी.........बापरे......काय हा साड्यांचा खजिना.....एक छोटंसं दुकानं टाकता येईल इतक्या साड्या आहेत.."


"अहो , आता नेसायच्या आहेत ना मला नवरात्रात दरदिवशी एक एक साड्या , म्हणून वर काढून ठेवल्या आहेत या साड्या....हे बघा , पहिल्या दिवशी आहे हा हळदीचा पिवळा रंग , दुसऱ्या दिवशी आहे डोळ्यांना प्रसन्नता देणारा हिरवा रंग , तिसऱ्या दिवशी आहे..........अग्गंबाई !....


"काय गं काय झालं ?


" अहो ,माझ्याकडे तिसऱ्या दिवसाचा राखाडी रंगच नाहीये साडीमध्ये...अरे देवा.......आता.......? अहो......... मी काय म्हणते ?


"कळलं , कळलं मला..."अहो, उद्या सकाळी आपण त्या कृष्णा सारीज मध्ये जाऊन राखाडी साडी घेऊया ना".... हेच सांगणार होतीस ना मला ?


" अय्या , मनातलं बरं ओळखायला लागलात की हो माझ्या ? "


" बाईसाहेब , ३० वर्ष झालीत म्हटलं संसाराला आपल्या , एवढी कला तर साधता यायलाच हवी ना मला "


" इश्य ! बरं पण मला अजून एक असं म्हणायचं आहे की या माझ्या इतक्या भरमसाठ साड्या आता माझ्याच्याने काही नेसवत नाहीत. तर काही साड्या मी प्रियंकाला आणि काही नलवंती ताईला देऊन टाकणार आहे. त्या वापरतील तरी या साड्या. त्यानिमित्ताने माझी आठवण सदैव त्यांच्याजवळ राहील."


" जशी आपली इच्छा राणी सरकार , आम्ही आपणांस कशीही काहीही करण्यापासून रोखले नाही तेव्हा आताही रोखणार नाही. "


" बरं , आता मी सायंकाळच्या स्वयंपाकास लागते. आपल्या दोघांनाही औषधे घ्यायची असतात तेव्हा रात्रीचं जेवण लवकर केलेलं बरं , नाही का ?"


" ओक्के मॅडम...!


      आणि गोड हसून दमयंती ताई स्वयंपाकासाठी निघून गेल्या. काही वेळानंतर अनिरुद्धरावांना स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा मोठ्ठा आवाज आला. तिथे जाऊन पाहतात तो काय.......दमयंतीताई पोळ्या करत असताना चक्कर येऊन कोसळल्या होत्या. अनिरुद्धरावांनी ताबडतोब दमयंतीताईंना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर गार पाण्याचे हबके मारले , त्यांना अनेकदा आवाज दिला परंतु त्या काहीच प्रतिसाद देत नव्हत्या. अनिरुद्धरावांनी त्यांच्या २/४ शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली अन् शेजारी देखील तत्परतेने धावून आले. अनिरुद्धरावांनी तडक अँम्ब्यूलंसला कॉल केला अन् दमयंतीताईंना घेऊन हॉस्पिटल गाठले.


      तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी दमयंतीताईंना तपासले. बाहेर येऊन त्यांनी अनिरुध्दरावांच्या खांद्यावर हात ठेवला व मोठ्या मुश्किलीने ते उद्गारले , " मि. अनिरुद्ध , आय एम सॉरी , बट..... बट शी इज नो मोअर......"


क्षणभर अनिरुद्धरावांना डॉक्टर काय म्हणाले ते समजलेच नाही , परंतु त्यांच्या सोबत असलेल्या जोशी काकांनी जेव्हा हे त्यांना पुन्हा एकवार सांगितले तेव्हा मात्र त्यांनी अक्षरशः लहान बाळासारखा हंबरडा फोडला.

"दमयंतीsssssss"


     दमयंतीताईंना हृदयविकाराचा प्रचंड मोठा झटका येऊन त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. अनिरुद्धरावांसाठी आणि त्यांचे सख्खे शेजारी असलेल्या जोशी काकांना देखील हा भयंकर मोठा झटका होता. जोशी काकांनी कसेबसे अनिरुद्धरावांना शांत केले अन् हॉस्पिटलमधूनच पियूषला न्यूयॉर्कला फोन लावला. पियूष ऑफिसला निघण्याच्या तयारीतच होता एवढ्यात जोशी काकांनी फोनवरून दिलेली ही भयंकर वार्ता ऐकून तिकडे पियूष अन् प्रियंका दोघेही कमालीचे हादरून गेले.परंतु त्यांना लवकरात लवकर भरतात पोचण्यासाठी संध्याकाळी ६:३० शिवाय फ्लाईटच नव्हती. भराभर तयारी करून , आपापल्या ऑफिसेस मध्ये कळवून अखेर ते संध्याकाळच्या फ्लाईटने निघाले.

      अनिरुद्धरावांनी जोशी काकांच्या आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्री १० च्या सुमारास दमयंतीताईंचा मृतदेह घरी आणला. पियूष अन् प्रियंका उद्या सकाळी पोचणार होते त्यामुळे मृतदेह बर्फात ठेवावा लागणार होता. जोशी काकांच्या मंदारने सगळी धावपळ करून बर्फाची व्यवस्था केली. दमयंतीताई आता आपल्यात नाहीत या बातमीमुळे त्यांच्याशी संबंधित प्रत्येक जण हादरून गेला होता की सकाळी तर आम्ही त्यांच्यासोबत छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आता अचानक .....दमयंती ताईंची गावातच राहणारी मोठी बहीण नलवंती आणि तिचे यजमान सतिशराव देखील धावत आले. लाडाची एकुलती एक धाकटी बहीण आपल्याला सोडून गेली म्हणून नलूताईंवर देखील आभाळ कोसळले होते. ज्याला जसे जसे कळत गेले तसा तसा प्रत्येकजण येऊन त्यांचे अंतिम दर्शन घेत होता , अनिरुध्दरावांना सावरत होता , त्यांचे अश्रू पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

     अनिरुद्धराव तर जणू प्राण निघून गेलेल्या कुडीसारखे निश्चल बसून होते. सकाळपासून चाललेली दमयंतीताईंची दगदग , त्यावरून आपले त्यांच्याशी झालेले संभाषण , ती थट्टामस्करी , त्यांनी आपल्यापाशी बोलून दाखवलेली राखाडी साडी घेण्याची इच्छा या सगळ्या गोष्टी आठवून त्यांना पुन्हा एक जोरदार हुंदका आला अन् ते हम्साहमशी रडू लागले. जोशी काका त्यांना जमेल तसे सावरत होते. तोच.....तोच पियूष अन् प्रियंका घरी आले अन् अश्रूंची एकच महानदी वाहू लागली.

     यथाकाल दमयंतीताईंचे अंत्यसंस्कार अन् दिवसकार्य पार पडले अन् आलेली पाहुणे मंडळी हळूहळू पांगली. आता घरात उरले होते ते फक्त चार जण : अनिरुद्धराव , पियूष , प्रियंका आणि नलूताई. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास अनिरुद्धराव कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले. बराच वेळ होऊन देखील ते घरी परतले नव्हते. सगळ्यांनी आसपास खूप शोधले त्यांना परंतु ते कुठेही सापडले नाहीत. त्यांना शोधायला आता बाहेर पडावे असे वाटून पियूष घराबाहेर पडणार इतक्यात अनिरुद्धराव घरात आले. त्यांच्या दोन्ही हातांत दोन पिशव्या होत्या.



पियूष : " बाबा , अहो , कुठे होतात तुम्ही ? आम्ही सगळीकडे शोधतोय तुम्हाला , किती घाबरलो होतो आम्ही माहितीये का ? काहीही न सांगता गेलात आणि....


अनिरुद्धराव : " पियू , सॉरी रे बाळा , मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं पण मी सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं का रे ? "


प्रियंका : असं काय बोलता आहात बाबा तुम्ही ? आम्ही नसतं हो अडवलं तुम्हाला जाण्यापासून. पण तुम्ही गेला होतात तरी कुठे ते सांगा ना "


अनिरुद्धराव : " प्रियंका , नलूताई....त्यादिवशी मी हिला मदत म्हणून कपाटं आवरत होतो तेव्हा तिच्या असंख्य साड्या पाहून मी चेष्टा केली होती तिची...तेव्हा ती मला म्हणाली , या सगळ्या साड्या आता मी प्रियंका आणि नलूताई दोघींना देणार आहे. त्यानिमित्ताने माझी काहीतरी आठवण राहील दोघींकडे. बहुधा तिला तिचा शेवट दिसला असावा.....पण तिला .....तिला फार इच्छा होती हो ताई , नवरात्रातले नऊही दिवस निरनिराळ्या साड्या नेसून नटायची. त्यासाठी तिने सगळी तयारी देखील केली होती. पण नेमकी तिच्याकडे .....तिच्याकडे राखाडी रंगाची साडी नव्हती गं प्रियंका आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाणार होतो गं तिच्यासाठी राखाडी रंगाची साडी घ्यायला , पण त्याआधीच........तिची ती साडी मनात राहूनच गेली रे पियूष...आणि म्हणूनच मी आज तुमच्या दोघींसाठी या...या राखाडी रंगाच्या साड्या आणल्या आहेत....नाही , मला कळतंय की घरात प्रसंग असा असताना मी नवीन साड्यांची खरेदी केली , पण...पण मी काय करू गं प्रियंका , हिची शेवटची इच्छा अपूर्ण राहून गेली गं.....म्हणूनच मी वेगळ्या रुपात तिची इच्छा पूर्ण करावी म्हणून या साड्या आणल्या. तुम्ही दोघी जेव्हा या साड्या नेसाल ना , तेव्हा आपली राखाडी साडी मनात राहिली याचा विषाद न वाटता दमयंती खूप आनंदी होईल.



   असे म्हणून ते पुन्हा रडायला लागले.


प्रियंका : " बाबा , तुम्ही शांत व्हा पाहू आधी....हे पाणी प्या अन् द्या त्या पिशव्या इकडे....तुम्ही इतक्या प्रेमाने माझ्यासाठी ही साडी आणली आहे , मी नेसेन ती साडी , अगदी विरेपर्यंत नेसेन.


नलूताई : हो अनिरुद्धराव , दमूच्या आत्म्याला जर याप्रकारे मुक्ती आणि समाधान मिळणार असेल ना तर मी देखील तिची इच्छा डावलणार नाही.तुम्ही स्वतःला नका इतका त्रास करून घेऊ.


या दोघींनी आपल्याला समजून घेतले आणि दमयंतीची अखेरची राखाडी साडी नेसण्याची इच्छा अशा पद्धतीने पूर्ण झाली या समाधानाने त्यांनी दमयंतीताईंच्या तसबिरीसमोर हात जोडले. तसबिरीतून दमयंती ताई प्रसन्न स्मितहास्य करत होत्या.


 - वैष्णवी कुलकर्णी

Comments